मुंबई : टाईमपास १ आणि २ नंतर हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या टाईमपास ३ची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे यातील संवाद तसेच गाणी सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. अखेर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. यामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता प्रथमेश परब आहेत; त्यांनी 'पालवी' आणि 'दगडू' ही पात्रं साकारली आहेत. भाग १ आणि २च्या यशानंतर 'दोन नंबर लव्हचा हा एक नंबर लोचा' असं म्हणणारा हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडला आहे हेही पाहणे महत्वाचे आहे. या चित्रपटाने चार दिवसात केलेली कमाई नुकतीच समोर आली आहे.
रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास ३' शुक्रवारी २९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. फक्त प्रेक्षकांनीच नाही तर मान्यवरांनी देखील भरभरून कौतुक केले आहे. हृता या चित्रपटातील बिनधास्त, काहीसा मवाली अंदाज पासून चाहते भलतेच खुश झाले आहेत. प्रेम, विनोद, भावनिक, मस्ती असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने चार दिवसात जवळपास ४.३६ कोटींची कमाई केली आहे. यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट दिग्दर्शक रवी जाधव यांनी शेअर केली आहे. असे असले तरी एक चिंता निर्मात्यांना लागून राहिली आहे.
या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी ८० लाखांची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी त्यात वाढ होऊन दोन दिवसांची कमाई १ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. रविवारी या प्रतिसादात आणखी वाढ झाली आणि सोमवार अखेर एकूण कमाई ४.३६ कोटी रुपये इतकी झाली. ही आनंदाची बातमी रवी जाधव यांनी सोशल मीडियावर दिली.
आज ४.३६ कोटीकमावले असले तरी येत्या काळात इतर चित्रपटांशी असलेली स्पर्धा आणि चित्रपटाचा निर्मिती खर्च याचे गणित पाहून निर्मात्यांना चिंता वाटत आहे. या चित्रपटाचा एकूण निर्मिती खर्च हा अंदाजे १० कोटी रुपये इतका आहे. त्यामुळे किमान तो तरी भरून काढण्यासाठी या चित्रपटाच्या कमाईत वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट होतोय की फ्लॉप हे लवकरच कळेल.