बंगळूरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी दि. २७ जुलैच्या मध्यरात्री घोषणा केली की राज्य सरकार शांतता भंग करण्याचा कट रचणाऱ्या देशविरोधी आणि दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी विशेष प्रशिक्षण, बुद्धिमत्ता, शस्त्रास्त्र आणि संसाधनांसह कमांडो फोर्स तयार करणार आहे. मंगळवारी दि. २६ जुलै रोजी रात्री दक्षिण कन्नड येथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात निर्माण झालेल्या अशांततेनंतर मुख्यमंत्री बोम्मई एका तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
“बातमी ऐकून माझ्या मनाला शांती मिळाली नाही, मी तेव्हा आणि तिथेच त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले… हर्षाच्या (बजरंग दलाचा कार्यकर्ता) मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी हे घडले… हे अमानवी आणि निषेधार्ह आहे.” असे मुख्यमंत्री बोम्मई पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले. अशा घटकांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मारेकऱ्यांना लवकरच पकडले जाईल, असे ते म्हणाले, परंतु या प्रकरणामध्ये आंतरराज्यीय मुद्द्याचा समावेश आहे. असे ते पुढे म्हणाले. याआधी बुधवारी दि. २७ जुलै रोजी त्यांनी "कुटुंबाला न्याय दिला जाईल", असे आश्वासन दिले होते. ते म्हणाले, “सामाजिक अशांतता आणि कलह निर्माण करणाऱ्या मंगळुरूमधील जघन्य कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना ठेचून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
बसवराज बोम्मई यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कर्नाटक भाजपने गुरुवारी सौधा येथे अधिकृत कार्यक्रम आणि दोड्डाबल्लापूर येथे ‘जनोत्सव’ या मेगा मेळाव्याचे नियोजन केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. परंतु, नेतारू यांच्या हत्येनंतर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर बीजेवायएमचे सदस्य व्यथित झाले आणि त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर सामूहिक राजीनाम्याची धमकी देणाऱ्या पोस्ट टाकल्या. कर्नाटकचे भाजप आमदार रेणुकाचार्य यांनीही भाजपची सत्ता असूनही हिंदू सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. राज्यातील हिंदूंना संरक्षण न दिल्यास आमदार पदाचा राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
या प्रकरणावर कर्नाटक आणि केरळ पोलिसांमधील समन्वयाबद्दल बोलताना ते म्हणाले, “मंगळुरुमध्ये मंगळवारी प्रवीणची हत्या झाली. दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कर्नाटक पोलीस अधिकारी त्यांच्या केरळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. पोलिस महासंचालकांनीही केरळच्या पोलिस महासंचालकांकडे हा मुद्दा उचलून धरला आहे. पथके तयार करण्यात आली असून, मारेकऱ्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. दोषींना लवकरच पकडले जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा होईल.”