तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार आहात?

रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

    20-Jul-2022
Total Views | 40
ramdas kadam
 
 
 
 
 
मुंबई : “गेल्या महिन्याभरात पक्षाची जी अवस्था झाली आहे, ती पाहवत नाही. तर जे ५० वर्षांमध्ये उभे केले, ते आता पत्त्यांच्या पानाप्रमाणे कोसळत असल्याने आपल्याला रात्र-रात्र झोपही येत नाही,” असे भावनिक वक्तव्य पक्षाची झालेली अवस्था सांगताना रामदास कदम यांनी केले. रामदास कदम यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. यानंतर उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांच्यावर पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पत्र काढण्यात आले. त्यानंतर रामदास कदम यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
 
 
मीच राजीनामा दिला
रामदास कदम म्हणाले की, “मीच राजीनामा समोरून दिला, तर हकालपट्टीचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही किती लोकांची हकालपट्टी करणार आहात? उलटपक्षी उद्धव ठाकरे यांनी ५२ वर्ष काम करणारा नेता राजीनामा देतो, तर कमीतकमी एक फोन तरी करायला पाहिजे. रामदासभाई काय झालं? बोलू आपण. काहीच नाही. थेट हकालपट्टी.”
 
 
पवारांवरील प्रेम कमी होत नव्हते
“उद्धव ठाकरे आजारी होते. ते बाहेर पडत नव्हते. त्याचा फायदा शरद पवार आणि अजितदादांनी घेतला. मी उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले होते. त्यात शरद पवार कुणबी समाजाला बोलवून घेऊन कुणबी भवनासाठी पाच कोटी देतो, तुम्ही शिवसेना सोडून राष्ट्रवादीत या असे सांगितले. पाच कोटी दिले. पैसे शासनाचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवारांनी कुणबी कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादीत घेतले. मी उद्धव ठाकरेंना फोटो पाठवले. अजितदादा चेक देतानाचे फोटो दिले. मी सातत्याने हे सांगितले, आमदारांनाही सांगितले. अजितदादा पडलेल्या आमदारांना बोलावून आमच्या मतदारसंघात पैसे देताहेत आणि आम्हाला निधी मिळत नाही, हे प्रत्येक आमदार सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण, उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते. एकनाथ शिंदेंनी सांगण्याचा प्रयत्न केला, आम्ही केला. तरीही उद्धव ठाकरेंचे पवारांवरील प्रेम काही कमी होत नव्हते,” असे त्यांनी सांगितले.
बंडखोरांचे आभार
 
 
 
“मी एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. ५१ आमदारांचे आभार मानतो. १२ खासदारांचे आभार मानतो. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानतो. त्यांनी हे पाऊल उचलले नसते, तर शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना संपवली असती,” असा घणाघात कदम यांनी केला.
 
 
 
मी बोललो तर भूकंप होईल
“भविष्यात माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल बाळासाहेबांची शिवसेना अभेद्य राहिली पाहिजे. पुन्हा भगवा फडकला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना वाढली पाहिजे. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर पडणार. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तिथे मी दौरे करणार. उद्धव ठाकरेंना एवढीच विनंती आहे की, मी नाईलाजाने राजीनामा दिला. मी फार संयम पाळला. प्रचंड संयम पाळला. मी काय चूक केली. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत. मी नाही बोलणार. मी बोललो तर भूकंप होईल. मला तुटलेल्या गोष्टी जोडायच्या आहेत. तो प्रयत्न मी करणार आहे,” असे रामदास कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
वरूण सरदेसाईची शिंदेंकडून युवासेनेच्या राज्य सचिव पदावरून हकालपट्टी
आ. आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांची एकनाथ शिंदे यांनी युवासेनेच्या राज्य सचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. त्याच्याऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांचा पक्षातील कामामध्ये हस्तक्षेप वाढल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121