नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या सोशल मिडीयावर शेअर केली आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटात पल्लवी जोशी यांनी म्हटलेले 'हम देखेंगे' या गाण्याची एका मुलीने तिच्या शब्दात पुनर्रचना केली आहे. या गाण्यात आर्यांच्या देशाचे, आपल्या हिंदु संस्कृतीचे आपल्या गोड आवाजात तिने वर्णन केले आहे. ज्यांनी या देशासाठी बलिदान दिले, त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत, असे म्हणत तिने हे गाणे गायले आहे.
या मुलीच्या आवाजाने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीही भारावून गेले आहेत. ही मुलगी अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी आपल्या सोशलमिडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच तिला भेटण्याची आणि तिच्यापर्यंत पोहोचण्याची तीव्र इच्छा विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
एक नेटकरी तिचे गाणे ऐकून म्हणत आहेत, 'हिचा आवाज ऐकून अंगावर शहारा आणि डोळ्यांत पाणी आले! केवळ अप्रतिम!' तर दुसरे म्हणत आहेत, 'आपल्या सुंदर देशाचे वर्णन इतक्या अचूक शब्दात आणि योग्य गाण्याची निवड करून केले आहे, खरंच कौतुकास्पद आहे!' 'तिचा आवाज आणि शब्द ऐकून निःशब्द झालो!' असेही काही जण म्हणत आहेत.