कल्याण : कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा आज कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत आणखीन चार दिवसांची वाढ करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बसीर शेख यांनी दिली आहे.
सुरुवातीस हे प्रकरण आत्महत्ये पूरते मर्यादीत होते. तपासात तरुणीच्या मोबाईलमधील तिने तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार झाला याच्या नोट्स लिहून ठेवल्या होत्या. या प्रकरणात सात तरुण आणि एक तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. त्यांना यापूर्वी पाच दिवसांची कोठडी मिळाली होती. दरम्यान पाच दिवसात तरुणीच्या प्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांची भेट घेऊन काही कलमे लावली नसल्याने ती लावण्यात यावी अशी मागणी केली होती.
तसेच नागरीकांनी या घटनेच्या निषेधार्थ काल कल्याण पूर्व भागात रॅली काढली होती. आज आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच आरोपींच्या विरोधात बलात्काराचे कलम आणि आयटी अॅक्टची कलमे लावण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासाअंती ही कलमे वाढविण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास अजून सुरु आहे.