मुंबई : बहुचर्चित असलेली महाराष्ट्र विधानपरिषदेची मतदान प्रक्रिया अखेर पार पडली. राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या आमदाराने नेमकं कोणाला मतदान केल आहे, हे प्रतोद किंवा व्हीपच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींना समजतं. विधानपरिषदेत मात्र आमदार कोणाला मतदान करतील हे समजणे अवघड असत. परंतु असे असताना देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी "उसे गुमाँ है कि मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यक़ीं है कि ये आसमान कुछ कम है". असे सूचक ट्विट करत काँग्रेसच्या विजयाबद्दल खात्री असल्याचे सुचवले.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने मदत केली नाही म्हणून शिवसेनेचा उमेदवार पडला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतील मतांच्या कोट्यात ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने बदल करून स्वतःची मतं वाढवून घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जाते.
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडे स्वपक्षीय ५५ आमदारांसह बच्चू कडू यांच्या प्रहारचे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जैस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात असल्या कारणाने विधानपरिषदेसाठी मतदान करता आले नाही. मलिक व देशमुखांच्या रूपाने दोन मतं वजा झाल्याने राष्ट्रवादीकडे काठावर विजय संपादन करता येईल इतकी मतं शिल्लक आहेत. मविआमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मतांची गरज आहे. शिवसेनेची काही मतं काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांना मिळावित, यासाठी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव टाकला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्यास महाविकास आघाडी धोक्यात येईल असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसकडून दिला गेला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत अप्रत्यक्ष कमळबळ मिळावे यासाठी बाण जरा बोथट झाला आहे का? असा थेट प्रश्नही कॉंग्रेसकडून केला गेला. रात्री उशिरापर्यंत माविआच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेने आपल्या कोट्यातील काही मते काँग्रेसला देण्याबाबद काबुल केले असल्याचे सांगण्यात आले आहे.