ठाणे : ठाणे महापालिकेने घरबसल्या केलेल्या ओबीसी सर्वेक्षणावरून टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनेही आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे. राष्ट्रवादी ओबीसी सेलने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ओबीसींच्या भविष्याशी खेळ न करता ‘इम्पिरिकल डेटा’ योग्य पद्धतीने गोळा करण्याची मागणी केली.
समर्पित आयोगामार्फत ओबीसी ‘इम्पिरिकल डेटा’ तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम ज्या पद्धतीने सुरू आहे ती पद्धत अतिशय चुकीची असून त्यामुळे ओबीसींवर प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आडनावावरून जात ठरवणे चुकीचे असून यामुळे पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार आहे, असे फलक झळकवून ओबीसी सेलच्या निदर्शकांनी एकप्रकारे आघाडी सरकारलाच घरचा अहेर दिल्याची चर्चा रंगली आहे.