मुंबई : "सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत; त्यांना ना कधी संघर्ष करावा लागलाय, ना कधी त्यांनी संघर्ष पाहिलाय.", असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला. बुधवारी (दि. ४ मे) नागपूर येथे एका कार्यक्रमाला जाण्यापूर्वी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
"आमच्यासारख्या लाखो कारसेवकांची कितीही थट्टा उडवली तरी ज्यावेळी बाबरीचा ढाचा पाडला त्यावेळी आम्ही तिथे होतो, याचा आम्हाला गर्व आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे मी जर १८५७ च्या युद्धात असेन तर तात्या टोपे आणि झाशीची राणी यांच्यासोबत लढत असेन.", असे फडणवीस म्हणाले. "मात्र तुम्ही त्यावेळी असाल तर नक्कीच इंग्रजांशी युती केली असणार. कारण आज तुम्ही १८५७ च्या लढ्याला युद्धाऐवजी शिपायचं बंड मानणाऱ्यांशी युती केली आहे.", असे म्हणत पुढे त्यांनी आदित्य ठाकरेंवर चांगलाच घाणाघात केल्याचे दिसून आले.