नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ घरी म्हणजे काश्मीर मध्ये परत येण्याचे आवाहन केले आहे. काश्मीर मधील नवरेह महोत्सवानिमित्त त्यांनी व्हिडिओ माध्यमातून काश्मिरी समुदायाला रविवारी संबोधित केले आहे. जम्मूमधील संजीवनी शारदा केंद्रातर्फे १ ते ३ एप्रिल या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याप्रसंगी डॉ. मोहनजी भागवत काश्मिरी जनतेला संबोधित करत होते.
या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी द काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटामुळे ३२ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचे दाहक सत्य समोर आले आहे असा उल्लेख केला. काश्मीरच्या राजा ललितादित्याच्या इतिहासाचासुद्धा उल्लेख त्यांनी केला. काश्मिरी पंडितांची तुलना त्यांनी इस्त्राईलच्या ज्यू समाजाशी केली. जसे ज्यू लोक आपल्या मायभूमीतून विस्थापित झाले पण त्यांनी संकल्प केला आणि ते त्यांच्या मायभूमीत परतले तसेच त्यांच्यातील अंगभूत गुणांमुळे आणि उद्योगशीलतेमुळे ते जगातील बलशाली राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. त्याचप्रमाणे काश्मिरी पंडितांनाही आता त्यांच्या मायभूमीत परतण्यास अडचण येणार नाही. भारतीयांच्या भावना त्यांच्या पुनर्वसनाच्या बाजूने आहेत असेही त्यांनी सांगितले.