ठाणे (प्रतिनिधी): राज्यात विजेचे संकट उभे ठाकले असून लोडशेडिंगमुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. मात्र धनधडग्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. तेव्हा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना मंत्रिपद झेपत नसेल तर त्यांनी पद सोडून द्यावे. अशी मागणी ठाणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. राज्याचे ऊर्जाखाते काँग्रेसकडे असून जर वीज चोरी होत असेल तर ऊर्जामंत्रीही यामध्ये सामील असल्याचा आरोप देखील चव्हाण यांनी करून काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे.
रेमंड कंपनी वीजचोरी प्रकरण ; सखोल चौकशीची काँग्रेसची मागणी
शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे किरकोळ वीज बिल थकल्यास त्यावर तत्काळ कारवाई करणाऱ्या महावितरणची कोट्यवधींची थकबाकी असणाऱ्या बड्या ग्राहकांना मात्र अभय मिळत असल्याची बाब ठाणे कॉंग्रेसने उघडकीस आणली आहे. रेमंड कंपनी ने बांधकाम कंपनीसाठी वीज चोरी केल्याप्रकरणी आकारण्यात आलेले १ कोटी १ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम अधिक्षक अभियंत्याने माफ केल्याचा आरोप काँग्रेसने केला, तेव्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासह संपूर्ण वीज चोरीची एसआयटी चौकशीची मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी केली. ठाणे कॉंग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि मागणी केली.या प्रसंगी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे,इंटकचे महाराष्ट्र प्रदेश वीज कामगार कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष संदीप वंजारी हे उपस्थित होते.