शांघाय आणि ‘सीसीपी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2022   
Total Views |

china
 
 
चिनी कोरोना विषाणूने संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. प्रामुख्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थांवर होताना दिसत आहे. अर्थात, त्याचा अतिशय विपरित परिणाम चीनवरही होत असल्याचे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. देशांतर्गत परिस्थितीचा थांगपत्ता जगाला न लागू देणार्‍या चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमधील महत्त्वाचे शहर असलेल्या शांघायमधील परिस्थिती चिनी राज्यकर्त्यांच्या हाताबाहेर जात आहे. याचा परिणाम एकूणच चीनच्या राजकीय आणि सामाजिक धोरणावरही होणार आहे. येथील २५ दशलक्ष रहिवासी देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी आहेत. ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये शहराचे दरडोई ‘डिस्पोजेबल’ उत्पन्न ४० हजार, ३५७ युआन (६,२९१ डॉलर) होते, जे चीनमध्ये सर्वाधिक आहे. शांघायमध्ये जगातील सर्वात व्यस्त कार्गो टर्मिनल आहे. २०१८ पासून चीनच्या ‘जीडीपी’मध्ये त्यांचे तीन टक्क्यांहून अधिक योगदान आहे.
 
 
शांघायचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘चिनी कम्युनिस्ट पार्टी’ अर्थात ‘सीसीपी’चे ते जन्मस्थान आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा बॉम्ब या शहरामध्ये फुटल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने लष्करास पाठविण्याचा निर्णय घेतला होता. चिनी लष्कराकडे शांघाय शहराच्या स्थानिक प्रशासनात मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शांघायचे रुपांतर कोंडवाड्यात झाले असल्याचे दिसून येत आहे. शांघायमध्ये प्रशासनाविरोधात जनतेचा रोष सातत्याने उफाळताना दिसत आहे. यावेळी लोकांच्या संतापाचे कारण त्यांच्या घराबाहेर होत असलेले सहा फूट उंच कुंपण बनले आहे. वास्तविक, शांघाय प्रशासन कोरोना महामारीपासून बचावाच्या नावाखाली लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठेवण्यास भाग पाडत आहे. ‘लॉकडाऊन’असतानाही प्रशासनाने उचललेल्या या पावलांमुळे लोकांमध्ये संताप आहे. पांढरे कोट आणि हेल्मेट घातलेले कामगार शांघायमधील घरांमागे घरांसमोर हिरव्या रंगाचे सहा फूट उंच कुंपण उभे करतात.
 
 
एका महिन्यापेक्षा जास्त काळ ‘लॉकडाऊन’ केल्याने शांघायच्या एकूण वास्तविक उत्पन्नातील जवळपास २.७ टक्के घट होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, याचा परिणाम शांघायच्या पाडावासह ‘सीसीपी’वरही होण्याची शक्यता आता चिनी राजवटीचे अभ्यासक वर्तवित आहेत. कारण, कोरोना संसर्गाच्या पहिल्या उद्रेकामध्ये शांघाय आणि बिजिंगमध्ये चीनने केलेल्या उपाययोजना या आदर्श असल्याचा प्रचार आणि प्रसार जगभरात करण्यात आला होता. शांघाय हे ‘सीसीपी’चे जन्मस्थान असल्याने या प्रचाराला एकप्रकारची भावनिक किनारही देण्याचा प्रयत्न ‘सीसीपी’द्वारे करण्यात आला होता. याद्वारे, जगभरात केवळ चीनमध्येच कोरोना संसर्गाला मात देण्यात यश आले असून, हे सर्व ‘सीसीपी’च्या रणनितीमुळेच होत असल्याचेही ढोल बडविण्यात येत होते.मात्र, आता ‘सीसीपी’चे अपयश शांघायमधील जनतेस लक्षात येण्यास प्रारंभ झाला आहे. या प्रकाराविरोधात सोशल मीडियावर प्रशासनावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत.
 
प्रशासनाच्या या निर्णयावर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार टीका होत आहे, असे करून प्रशासन त्यांचे हक्क हिरावून घेऊन जनावरांसारखी वागणूक देत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये लोक बाल्कनीतून कुंपण घालणार्‍या जवानांना असे न करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये लोक प्रशासनाकडून करण्यात येत असलेले कुंपण तोडताना दिसत आहेत. त्यामुळे शांघायचे रुपांतर आता कोंडवाड्यात झाले असल्याचे अतिशय स्पष्ट दिसत आहे. यामुळे तेथील जनतेच्या मनात ‘सीसीपी’च्या धोरणांविषयी अविश्वास निर्माण होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. सध्या चीनची सत्ता शी जिनपिंग यांच्याहाती केंद्रित आहे. मात्र, शांघायमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ‘सीसीपी’ला एकप्रकारचा धोरणलकवा आल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारची स्थिती हाताळण्याची ‘सीसीपी’ची तयारी नसल्याचेही स्पष्ट होत आहे. कारण, अशाप्रकारे आपल्या धोरणांवर संशय अथवा त्यांना विरोध होईल, याची कल्पना ‘सीसीपी’ने केली नव्हती. त्यामुळे शांघायच्या दुरावस्थेचा परिणाम ‘सीसीपी’वरही होताना दिसत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@