मुंबई: "रवी राणा आणि नवनीत राणा त्यांच्यावरील कारवाई म्हणजे ठाकरे सरकारकडून लोकशाही संकटात टाकली जातेय" असा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी जर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असतील तर सरकारची, प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे पण सध्या सरकारविरोधात आंदोलन करणार असेल तर त्याला आंदोलनानेच उत्तर दिले जाते ही अत्यंत चुकीची प्रथा पडली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला जाण्यावरून मोठा गदारोळ उठला होता. ते तिथे गेले तर त्यांच्यावर हल्ला करण्यात येईल अशा धमक्याही दिल्या गेल्या तेव्हाही फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा करणारच अशी भूमिका कायम ठेवली आणि स्वतःच्या घरी पूजा करू असे जाहीर केले. इतक्या खालच्या पातळीवर टीका होऊनसुद्धा फडणवीसांनी चर्चेचा मार्ग सोडला नाही पण सध्या राज्यात संवाद संपला आहे" अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.