नवी दिल्ली : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अर्नाळा ऐतिहासिक सागरी किल्ल्यावरील मच्छीमार स्वातंत्र्याला ५० वर्षे झाल्यानंतरही वीजेपासून वंचित होते. ६०० मच्छीमार कुटुंबाना समुद्रमार्गे वीज कशी द्यायची हा प्रश्न बिकट होता. त्यासाठी भरमसाठ खर्चाचे आणि लाभान्वित होणाऱ्या लोकसंख्येचे गणित भलतेच व्यस्त असल्याने महाराष्ट्र वीज मंडळ या ६०० कुटुंबाना वीज देण्यास तयार नव्हते.
खासदार बनल्यापासून म्हणजेच १९८९पासून राम नाईक यांचे यासाठी सतत प्रयत्न सुरु होते. १९९९ मध्ये ते स्वतः पेट्रोलियम मंत्री झाले. कच्चे तेल काढून नेण्यासाठी समुद्रात शेकडो किलोमीटर टाकलेल्या पाईपलाईन पाहून त्यांनी त्याचप्रमाणे समुद्रात वीज वाहून नेण्याचे काम सामाजिक दायित्व म्हणून ओएनजीसीने करावे असे सुचविले आणि ते पूर्ण झालेही.
७ एप्रिल २००२ रोजी या किल्ल्यात वीज आली आणि तेव्हापासून गेली २० वर्षे अव्याहतपणे मच्छीमार ७ एप्रिलला ‘प्रकाश दिन’ साजरा करतात. त्यानिमित्ताने नाईक यांनाही स्मरतात. यंदाच्या प्रकाश दिनी वीस वर्षे समुद्रात उभे राहून गंजलेल्या व झिजलेल्या दुरुस्तीची नितांत गरज असलेल्या मनोऱ्यांची देखभाल करण्याची आवश्यकता असल्याचे मच्छीमारांनी ‘प्रकाशदाता’ राम नाईक यांच्या कानावर घातले. या मनोऱ्यांची वेळीच डागडुजी केली नाही तर वीज पुरवठा खंडीत होईलच; खेरीज गंभीर धोका उद्भवण्याची शक्यता नाईक यांच्या ध्यानी आली. अर्थात हा डागडुजीचा खर्चही ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरील असल्याने खास या कामासाठी राम नाईक यांनी विद्यमान पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांची काल दिल्लीत भेट घेतली.
ओएनजीसीने केलेल्या या आगळ्यावेगळ्या लोकोपयोगी कामाची माहिती पेट्रोलियम मंत्र्यांना देऊन समुद्राच्या पाण्याचा सतत मारा झाल्याने झिजलेल्या मनोऱ्यांची छायाचित्रेही दाखविली. ही डागडुजी चांगल्या दर्जाची झाली पाहिजे जेणेकरून कोणताही धोका शिल्लक न राहाता अर्नाळा किल्ल्यातील मच्छीमारांना अखंड वीजपुरवठा होत राहील यासाठी तातडीने मनोऱ्यांची दुरुस्ती करावी असा आदेश देण्याचे आश्वासन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ओएनजीसीला दिले. देशात पेट्रोलियम मंत्रीपदी संपूर्ण पाच वर्षांचा काळ राहिलेले आजमितीस राम नाईक हे एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच विशेष अगत्याने यावेळी विद्यमान पेट्रोलियम मंत्र्यांनी नाईक यांचे स्वागत केले.