नवी दिल्ली : भारतीय प्राचीन परंपरेचा वारसा म्हणून ओळख दर्शवणाऱ्या २९ पुरातन वस्तू ऑस्ट्रेलियाने पुन्हा भारताच्या स्वाधीन केल्या आहेत. यात भगवान शंकर, भगवान विष्णू आणि जैन परंपरेशी संबंधित काही वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या वस्तूंची पाहणी करत त्यांची माहिती जाणून घेतली.
ऑस्ट्रेलियाने या २९ पुरातन वस्तू भारताला परत करून एक ऐतिहासिक पाऊल उचललं असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या पुरातन वस्तू 'भगवान शंकर आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि शोभेच्या वस्तू अशा एकूण सहा श्रेण्यांत वर्गीलेल्या आहेत. तसेच यात वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, पितळ अशा विविध प्रकारच्या साहित्यापासून बनवण्यात आलेली शिल्पे आणि कागदावर काढलेली चित्रेही असल्याचे उघड झाले आहे.
या पुरातन वस्तू प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा येथील परंपरेचे प्रतिक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाकडून त्या संबंधित राज्यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.