अनिल परब गोत्यात?, निकटवर्तीयांवर धाडी! सोमय्या २६ मार्चला रिसॉर्टवर जाणार

२६ मार्च रोजी अनिल परबांच्या रिसॉर्टला सोमय्या देणार भेट

    19-Mar-2022
Total Views | 152

Kirit


मुंबई : अनिल परब, भागीदार सदानंद कदम, सचिव बजरंग खरमाटे यांचा कोट्यवधी रुपयांची लाच, बेनामी मालमत्ता, मनी लाँड्रिंग व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्विट करत २६ मार्च : चला दापोली अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया! म्हणत पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांच्यावरही आयकरची धाड पडली आहे.

प्राप्तीकर विभागाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी निकटवर्तीयांवर करण्यात आलेल्या धाडींमुळे राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरीतील एकूण २६ मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान केलेल्या कारवाईबाबत प्राप्तीकर विभागाकडून रीतसर माहिती जारी करण्यात आली असून, यावरून विरोधकांनी आगामी दिवसांत परब अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.


दापोली स्थित जमिनींसंदर्भात प्राप्तीकर विभागाने परब यांच्या निकटवर्तीयांविरूद्ध धाडी टाकल्या होत्या. यात तपास संस्थेकडून कारवाईच्या रडारवर आलेले सरकारी अधिकारी बजरंग खरमाटे आणि संजय कदम यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. अनिल परब, सदानंद कदम, बजरंग खरमाटे हे कोट्यवधींची रोकड, अपारदर्शक व्यवहार आणि आर्थिक अफरातफरीमध्ये सहभागी असून, संबंधितांवर प्रवर्तन निर्देशनालयाने (ईडी) कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी नुकतीच केली आहे.



आयकर विभागाच्या प्रसिद्धी पत्रकातील उल्लेख


राज्य सरकारी अधिकार्‍याच्या प्रकरणात चौकशीदरम्यान त्यांनी, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी मागील दहा वर्षांच्या काळात पुणे, सांगली आणि बारामती येथील प्राइम लोकेशनमध्ये मालमत्तांच्या स्वरुपात प्रचंड संपत्ती खरेदी केल्याचे उघड झाले. त्यांच्या कुटुंबाकडे पुण्यात एक बंगला आणि एक फार्म हाऊस, तासगावमध्ये एक भव्य फार्म हाऊस, सांगलीत दोन बंगले, तनिष्क आणि कॅरट या नामांकित ब्रँडची शोरूम आहेत.


तसेच, पुण्यातील विविध ठिकाणी पाच फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, मोकळे भूखंड, सांगली, बारामती, पुणे आणि गेल्या सात वर्षांत १०० एकरहून अधिक शेतजमीन खरेदी केली. मालमत्तेच्या संपादनाचे स्त्रोत आणि दुकाने आणि बंगल्यांच्या भव्य आतील भागांवर खर्च केलेल्या रकमेची तपशीलवार चौकशी सरू आहे. या कुटुंबाकडे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे शोरूम, तनिष्क शोरूमसह अनेक व्यवसाय आहेत, असे आयकर विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


या सरकारी कर्मचार्‍याच्या नातेवाईकांकडून चालवल्या जाणार्‍या बांधकाम व्यवसायाला राज्य सरकारकडून अनेक कंत्राटे देण्यात आली. तसेच, बोगस खरेदी आणि बोगस उपकरारांच्या माध्यमातून कराराच्या खर्चात वाढ झाल्याचा पुरावाही चौकशीतून मिळाला. बनावट कंत्राटांच्या माध्यमातून २७ कोटी रुपये मिळविल्याची बिले तसेच बारामती परिसरातील जमिनीच्या दोन कोटी रुपयांच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121