पुणे : "जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले नसते, तर देशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एखाद्या विवेक अग्निहोत्रीला 'महाराष्ट्र फाईल्स' नावाचा चित्रपट काढायची वेळ आली असती.", असे मत भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी बुधवारी पुण्यात मांडले. राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'शिवजयंती महोत्सव' कार्यक्रमात ते बोलत होते.
"आज हिंदू म्हणून जर आपण गर्वांने जगात उभं राहत असू तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जातं. त्यांनी आपलं रक्षण केलं असून हिंदुत्वाचा अग्नी प्रत्येकाच्या हृदयात चेतवला आहे. महाराजांनी त्यांच्या काळात कोणत्या परिस्थीतीत हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तिथल्या समाजाची महाराज येण्यापूर्वी काय परिस्थिती होती हे प्रत्येकाला माहित असलं पाहिजे. ते जाणून घेण्यासाठी सध्याचा काश्मीर फाईल्स चित्रपट बघणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यात जी परिस्थिती काश्मीरची होती साधारण तशीच परिस्थिती ही महाराज येण्यापूर्वी तिथल्या समाजाची होती.", असेही ते पुढे म्हणाले.