मुंबई: भारतरत्न, गानकोकिळा लाट मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. गायनाच्या क्षेत्रात स्वतः अढळ स्थान तयार करून कित्येक दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवले. इंदूरचा जन्म असलेल्या लता दीदींच्या गायन प्रवासाला बालपणापासूनच सुरुवात झाली. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे त्यांचे गुरु. वडिलांचा माझ्यावर कायमच वरदहस्त राहिला आहे. "मी आज काही बनू शकले ते त्यांच्याच आशीर्वादाने" असे त्या कायमच सांगत. वडील मराठी संगीत रंगभूमीवरचे प्रख्यात गायक नट होते. लता दीदींच्या गायन शिक्षणाची सुरुवात कशी झाली याची मोठी रंजक गोष्ट आहे. लता दीदींनी स्वतःच माधव गडकरी यांना दिलेल्या मुलाखतीत ही आठवण सांगितली होती.
"इंदूरला आमचा मुक्काम असताना वडिलांकडे गाणं शिकायला काही शिष्य येत असत. एके दिवशी एका शिष्याला पुरिया धनाश्री रागातील बंदिश शिकवत होते. थोड्यावेळाने त्या शिष्याला रियाज करायला सांगून वडील काही कामासाठी बाहेर गेले. मी, उषा,आशा अश्या आम्ही बाहेर खेळात होतो. खेळात असताना माझ्या लक्षात आलं की तो शिष्य बरोबर गात नाहीये, तेव्हा मी आत जाऊन त्याला ती बंदिश गाऊन दाखवली. मी गात असताना बाहेरून बाबांनी ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मला बाबांनी उठवलं आणि त्या पुरिया धनाश्रीच्या बंदिशीनेच माझं गायनाचं शिक्षण सुरु झालं" अशी आठवण लता दीदींनी सांगितली.
कल्पवृक्ष कन्येसाठी या कार्यक्रमात लता मंगेशकरांची माधव गडकरी यांनी मुलाखत घेतली होती.