पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारात काही सुडबुध्दी असलेल्या शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत सोमय्यांच्या हाताला दुखापतही झाली. याप्रकरणी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्याचे काही साथीदार सोमय्या यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना त्याठिकाणी आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना घेरत त्यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान झालेल्या हल्ल्यात हाताला दुकापत झाल्याने त्यांना पुण्यातल्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्यामुळे त्यांच्यावर कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७ यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.