मुंबई : शिवसेनेकडून पुण्यामध्ये आज महिला सक्षमीकरणाचे शिबीर राबवण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे त्याच पुण्यात शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलिसठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी "राज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेची महिलाशक्तीने आज योगायोगाने पुण्यातचं “महिला सक्षमीकरण” शिबीर आयोजित केलयं…. त्यामुळे शिवसेनेचा बलात्कारी कुचिकवर फक्त गुन्हा दाखल नाही तर पुणे पोलिसांनी तात्काळ अटक करत कारवाई करावी ही मागणी शिवसेना महिला नेत्यांकडून होईलचं ही अपेक्षा " अशी अपेक्षा आपल्या ट्विट द्वारे शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून केली आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर देखील जोरदार टीका करत म्हटले होते की, "बंधू म्हणवून मिरवणारा कामगारांचा स्वंयघोषित पुढारी व शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिक वर बलात्कार गर्भपाताचा गुन्हा शिवाजीनगरमध्ये दाखल झालाय. मुख्यमंत्री महोदय…फक्त गुन्हा दाखल करून नाही, तर आदरणीय बाळासाहेबांना स्मरुन तात्काळ कारवाई करा...आश्चर्य...बंधू म्हणवून घेणा-या गप्प का."
तसेच भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवरही ट्विटद्वारे टीका करत म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील महिला मुलींवर बलात्काराच्या घटना जवळपास रोज घडताहेत…साकीनाका घटनेनंतर विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली त्याला अतिशय निर्लज्जपणे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा निषेध आम्ही पत्र जाळून केला. गुन्हे दाखल केलेल्याला घाबरत नाही..नडत राहू आणि तुम्हाला भिडत राहू".