मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांना मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ट्विट करत चित्राताई वाघ यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली आहे. "वा रे बहाद्दर मुंबई पोलीस भाजप कार्यकर्ते, नेते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीच तुमची बहाद्दरी शिल्लक राहिलीये. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा. ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली आहे. ही षंढ सरकारची षंढ यंत्रणा, असे म्हणत खुलं आव्हान दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पाच महिन्यांपूर्वी साकीनाका बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. या प्रकरणी चित्रा वाघ यांच्या पाठपुराव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीले होते. या पत्राची चर्चा देशभर झाली. पीडितेवर बलात्कार आणि हत्येच्या या घटनेबद्दलच्या भयंकर परिस्थितीमुळे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावं, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना केली होती.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या या पत्राला उत्तर देत या प्रकरणी संसदेनेच दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. युपी, गुजरात, बिहार, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटनांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर चार दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचे राज्यपालांना सुचवले होते. या विरोधात चित्रा वाघ, आमदार मनिषा चौधरी, भारती लव्हेकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर याच पत्राची होळी केली. पाच महिन्यांनंतर आता सर्व नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मरीन ड्राईव्ह, मुंबई पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उप निरीक्षक एम. बी. पटेल यांनी भाजप नेत्या व प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांना नोटीस बजावली आहे. कलम ३७ (१), १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून २१ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता किल्ला कोर्ट येथे हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच हजर न राहिल्यास समन्स किंवा वॉरंट बजावल्यास सर्वस्वी जबाबदार आपण रहाल, असा इशाराही या नोटीशीद्वारे देण्यात आला आहे.
असल्या नोटीसांना आम्ही घाबरणार नाही!
"साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील होणाऱ्या अशा अन्याय अत्याचारांविरोधात विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी आम्ही केली होती. राज्यपालांच्या पत्राला निर्लज्जपणे उत्तर पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिले. बलात्कार पीडितांची थट्टा उडविली. याचा निषेध आम्ही मंत्रालयाबाहेर या पत्राची होळी केली. पाच महिन्यांनंतर आता आम्हाला नोटीसा बजावत आहेत. जर खरंच मुंबई पोलीसांमध्ये हिंम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करुन दाखवावा, ज्यांनी बलात्कार पीडितांची थट्टा केली. असल्या नोटीसांना आम्ही घाबरणार नाही! असल्या धमक्यांना आम्ही भीत नाही. जिथे अन्याय अत्याचार दिसेल. त्या त्यावेळी तुम्हाला सोलून काढण्याचे काम आम्ही करू, असा इशारा चित्राताईंनी यांनी दिला.
ठाकरे सरकारला खुलं आव्हान
ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यापूरतीच मुंबई पोलीसांची बहादूरी शिल्लक आहे. षंढ सरकारची षंढ यंत्रणा, असे म्हणत चित्राताईंनी मुंबई पोलीसांनी दिलेली नोटीस ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा ज्यांनी राज्यातील हजारो बलात्कारपिडीतांची थट्टा राज्यपालांना लिहीलेल्या पत्रात उडवली, असे खुले आव्हानही त्यांनी दिली आहे. "संजय राऊत यांनी राज्यातील यंत्रणा भाजप नेत्यांच्या मागे लावण्याचे सुतोवाच केले त्यानंतरची ही पहिली घटना आहे. मात्र, अशा घटनांना आम्ही भीक घालत नाही.", असेही त्या म्हणाल्या.