मुंबई: पुणे महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली. पोलिसांकडेव ८९ पानांचे तक्रारपत्र त्यांनी दाखल केले आणि यावर ७ दिवसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचा हात होता असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
"पुणे महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेले असून सुद्धा संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्या कंपनीला कोविड सेंटरची १३ कंत्राटे दिली गेली. सुजीत यांनी कंत्राटे मिळवताना दाखवलेली कागदपत्रे बनावट असून त्यांच्या कडे पुरेसे मनुष्यबळसुद्धा नव्हते. कित्येक कोविड सेंटर्स मध्ये पुरेसे नर्सेस- वॉर्डबॉय नव्हते, एवढेच नव्हे तर बीएमएस डॉक्टर्सना एमडी डॉक्टर्स आहेत दाखवून रुग्णांची फसवणूक केली आणि जीवाशी खेळ केला" असे आरोप सोमय्या यांनी केले.
"माझ्या मुलाला आणि पत्नीला धमकावले जात आहे. संजय राऊत यांनी मला बरबाद केले तरी चालेल पण रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नका. मी गेले १५ दिवस ही कागदपत्रे दाखवत आहे. तरीसुद्धा मुख्यमंत्री सुजीत पाटकरांना अटक का करत नाहीत?" असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.