नवी दिल्ली : भारतास यंदाच्या वर्षी ‘जी २०’ चे अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. त्याविषयी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपती भवनामध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील या बैठकीस उपस्थित होते.
भारतास यंदाच्या वर्षी ‘जी २०’ चे अध्यक्षपद प्राप्त झाले असून जगातील शक्तीशाली देशांचे नेतृत्व करण्याची संधी भारतास यानिमित्ताने प्राप्त झाली आहे. याअंतर्गत देशभरात २०० ठिकाणी विविध कार्यक्रम, परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे शिखर परिषद दि. ९ आणि दि. १० डिसेंबर २०२३ रोजी दिल्ली येथे होणार आहे. त्याविषयी केंद्र सरकारतर्फे सर्व पक्षांना माहिती देण्यासाठी राष्ट्रपती भवनामध्ये सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे बैठकीस ४० पक्षांचे अध्यक्ष-प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि सीताराम येचुरी, जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.