मुंबई : संभाजीनगर येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील अभियंता युवक दीपक सोनवणेचा काही दिवसांपूर्वी त्याचा इस्लाम धर्मात धर्मांतरण करण्यासाठी छळ, आर्थिक फसवणूक आणि मारहाण झाल्यासंदर्भातील प्रकरण उघडकीस आले होते. दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सदरचे वृत्त शनिवार, दि. 19 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजले होते. अखेरीस शुक्रवार, दि. 2 डिसेंबर रोजी पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर ‘अॅट्रोसिटी’ कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला असून दीपक सोनावणेने खासदार इम्तियाज जलील यांचेही नाव पुरवणी जबाबात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सोनवणे याने दि. 22 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या तक्रार अर्जात खासदार इम्तियाज जलील यांचे नाव व त्यांच्या लोकांनी मारहाण केल्याचा उल्लेख केला होता. मात्र, दि. 28 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत त्या घटनेचा उल्लेख नव्हता. त्यामुळे 28 ऑक्टोबर रोजीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. त्यामध्ये खा. इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीतव त्यांच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना पुरवणी जबाबात घेतली. दीपकच्या म्हणण्यानुसार, “खासदारांचे नाव घेतले, तर गुन्हाच दाखल होणार नाही,” असे त्याला एक पोलिसाने सांगितल्यामुळे त्याने त्या तक्रारीत खासदार जलील यांचे नाव व मारहाण केलेल्या घटनेचा उल्लेख केला नव्हता.
याबाबत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, एका पोलीस अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती पुरवली. तसेच एकांगी व पक्षपाती तपास केला. त्यामुळे हा तपास आता नव्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी करणार आहेत. संभाजीनगरमध्ये मागासवर्गीय समाजाला त्रास देऊन धर्मांतरित करण्याचा डाव रचणार्यांवर गुन्हा दाखल झाल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.