कणकवली : सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार नितेश राणेंनी आपल्या मतदार संघात विजयश्री खेचून आणला आहे. निवडणूकीच्या प्रचारादरम्यान नितेश राणेंच्या एका वक्तव्याचा विपर्यास करुन व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यांना नांदगावातील मतदारांनी चोख प्रत्युत्तर देत आपण राणेंच्याच पाठीशी कायम असल्याचे लोकशाही मार्गाने दाखवून दिले आहे.
धमकावले म्हणणाऱ्यांचे दात घशात!
आमदार नितेश राणे यांनी माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडून आणल्यास हक्काने निधी मागा, असे आवाहन केले होते. नांदगावात सरपंचांसहित ११ पैकी १० सदस्य भाजपाचे विजयी केले. आमदार नितेश राणेंविरोधात चालवलेला सोशल मीडियावरील प्रचार फोल ठरल्याचे मतदारांनी दाखवत आपल्या आमदारावर विश्वास कायम ठेवला आहे. आमदार नितेश राणे यांनी समस्त नांदगाववासियांना हक्काने सांगितले होते की, "माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा." त्याच नांदगाववासियांनी भाजपाचे सरपंच भाई मोरजकर आणि भाजपाचे ११ पैकी १० सदस्य निवडून दिले.
समस्त नांदगाववासिय राणे परिवारच्या पाठीशी आहेत, असा संदेश जनतेने मतपेट्यांतून दिला आहे. राणेंनी धमकावले म्हणणाऱ्यांचे नांदगावकरांनी दात घशात घातल्याची प्रतिक्रीया नितेश राणे समर्थकांनी यावेळी दिली आहे. कणकवली भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर आणि नवनिर्वाचित सरपंच भाई मोरजकर आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. मंगळवारी आमदार राणे कणकवलीतील विजयी जल्लोषात सहभागी झाले होते.
कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील ९० टक्के ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. सिंधुदुर्गातील ३१५ पैकी २५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. आपल्या गावचा विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही हे जनतेने कबूल केल्याने आज सिंधुदुर्गात भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळाला आहे. यापुढेही सर्व निवडणुका भाजपच जिंकेल आणि ठाकरे गटाला औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी प्रतिक्रीया आमदार नितेश राणेंनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १७ पैकी १४ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली. नितेश राणे यांनी यापूर्वीच १७ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणल्या. मंगळवारी निकाल लागल्यानंतर आणखी नऊ ग्रामपंचायती भाजपाने मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभववाडी तालुक्यात दोन ग्रामपंचायती ग्रामविकास पॅनलला मिळाल्या तर शिंदे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली.