पुणे : औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावरील महापारेषणच्या (१३२ केव्ही) अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांसाठी नवीन मनोरे उभारणीचे व इतर दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत तसेच, रविवार, दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत शिवाजीनगर, डेक्कनमधील काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
गणेशखिंड येथे महापारेषणचे (१३२ केव्ही) अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राला गणेशखिंड ते चिंचवड आणि गणेशखिंड ते रहाटणी या अतिउच्चदाब वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, या दोन्ही वीजवाहिन्यांचे मनोरे व तारांमुळे औंध ते रावेत ‘बीआरटी’ रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी ‘मोनोपोल टॉवर’ उभारण्यात येणार आहे.
दोन टप्प्यांमध्ये नवीन टॉवर उभारणी व १३२ केव्ही वीजवाहिन्यांच्या इतर तांत्रिक कामांमुळे महापारेषणच्या गणेशखिंड १३२ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. ३२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहेत. यात शिवाजीनगरमधील २८, तर कोथरूड विभागातील चार वीजवाहिन्यांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वनियोजित कामाच्या वेळेत शिवाजीनगर परिसरातील सुमारे ३८ हजार, ३०० तसेच डेक्कन व जंगली महाराज रोड परिसरातील सुमारे ८ हजार, ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव बंद ठेवावा लागणार आहे.
एफसी रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, मोदीबाग १, रेंज हिल्स, ई-स्क्वेअर, वडारवाडी, गोखलेनगर, लकाकी रस्ता, सेनापती बापट रस्ता, हनुमाननगर, मंगलवाडी, वेताळबाबा चौक, राजभवन, खैरेवाडी, अशोकनगर, यशवंत घाडगेनगर, पोलीस लाईन वसाहत यासह काही भागांचा पुरवठा बंद राहील.