नवी दिल्ली : ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे अकाऊंट्स पुन्हा बहाल केले. सीईओ एलन मस्क यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. मात्र, ट्रम्प यांनी ट्विटर वापरण्यास अद्याप तयारी दर्शविलेली नाही. ट्रम्प यांच्या मते, "आपण स्वतःच्या टुथ सोशलचा वापर करणेच कायम ठेवणार आहेत. या सोशल मीडियाची तुलना ट्विटरच्या परफॉर्मन्सशी केली आहे. ट्विटरपेक्षा सोशल टुथचं एंगेजमेंट अधिक चांगलं आहे, असे म्हणत मस्क यांनाही टोला लगावला आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी एका लीडशीप मिटींगमध्ये हे वक्तव्य केले आहे. ट्रप्म यांच्या अकाऊंटसवर ८.७ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी आपलं अखेरचं ट्विट ८ जानेवारी २०२१ रोजी केले होते. मस्क यांनी ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बहाल करण्यापूर्वी एक कौल घेतला होता. डोनाल्ड ट्रप्म यांचं अकाऊंट हे पुन्हा त्यांना सोपवलं पाहीजे का, असा सवाल त्यांनी विचारला होता.
दीड कोटींहून अधिक युझर्सने या मतदान प्रक्रीयेत सहभाग नोंदविला होता. ज्यात ५२ टक्के ट्विटर युझर्सनी होय तर ४८ टक्के नाही हा पर्याय स्वीकारला होता. कौल पूर्ण झाल्यानंतर मस्क यांनी वोक्स पोपुली, वोक्स देई' अशा एका लॅटीन म्हणीचा वापर केला होता. जनतेचा आवाज हाच देवाचा आवाज आहे, अशा आशयाचे ते ट्विट होते.