मुंबई : काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे आणि उधळलेल्या मुक्ताफळांमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल यांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्रात 'भारत जोडो' यात्रेला होणारा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. परवा मुंबईच्या सावरकर स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या शिवसेनेसह भाजपनेही राहुल यांच्या भूमिकेला कडवा विरोध केला होता. त्यातच आता राहुल गांधींच्या विधानाच्या विरोधात सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यामुळे एकंदर वातावरण पाहता सावकारांच्या विरोधात केलेले वक्तव्य राहुल गांधींच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमकं काय बोलले राहुल गांधी ?
सावरकरांना अंदमान निकोबार येथे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीपत्रे लिहायला सुरुवात केली होती. तुम्हाला जे काही हवे आहे ते आमच्याकडुन घ्या पण आम्हाला सोडा अशी विनंती त्यांनी इंग्रजांकडे केली होती. त्यावर इंग्रजांनी देखील त्यांना माफ केले आणि त्यांची कारागृहातून सुटका केली होती. देशविरोधी कृत्ये करण्यासाठी इंग्रजांनी सावरकरांना साथ देण्यास सांगितले आणि त्यांनी त्या नुसार इंग्रजांना मदत देखील केली,' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी हिंगोली येथे केले होते. त्यानंतर राहुल गांधींच्या विरोधात राज्यभरात निदर्शने आणि जोडो मारो आंदोलन सुरु झाले आहे.
राहुल गांधींच्या अटकेची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह आणि तथ्यहीन विधानाच्या विरोधात ही तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'देशासाठी २७ वर्षे कारावास भोगणाऱ्या वीरपुत्राचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत होते असा आरोप करत त्यांनी हे पाप केले आहे. या विरोधात आपण पोलिसांकडे तक्रार केली असून त्यांना अटक करण्यात यावी अशी आपली मागणी आहे.' रणजित सावरकर यांनी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात भारत जोडोला थांबवा
'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा. हे राज्य कायद्याचे आणि सावरकरांचे आहे असे दाखवून देऊया. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केले आहे.
राहुल गांधींचे विधान बेअक्कलपणाचे
भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकारांना त्यांनी भारताचा सुपुत्र म्हटले असून त्यांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. तसेच सावरकर यांनी ब्रिटिशांविरोधात अतिशय धाडसी युद्ध केले, त्याची नोंद इतिहासात होईल, असे नमूद केले आहे. पण राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही आणि नेहरूंना देखील वाचलेले नाही. बहुदा राहुल गांधी हे स्वतः केरळमधून निवडून आल्यामुळे हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे राहुल गांधींचे हे विधान हे बेअक्कलपणाचे आहे.
- आ. आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप
तर निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवला जाईल
“राहुल गांधींकडून ज्या पद्धतीने स्वातंत्रवीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे कोणाला न पटण्यासारखं आहे. या प्रकारांना आता आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे आज शेगांव येथे होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेच्या ठिकाणी जाऊन आमचा निषेध नोंदवणार आहोत. मनसेची निषेध नोंदवण्याची एक पद्धत आहे. यावेळी केवळ काळे झेंडे आम्ही दाखवणार नाही, आमचा निषेध कसा असतो, हे उद्या शेगावमध्ये सर्वांना बघायला मिळेल. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडवायची नाही. तुम्ही अशाप्रकार सावरकरांचा अपमान करणार असाल, तर निश्चितपणे तुम्हाला धडा शिकवला जाईल”
- संदीप देशपांडे, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना