मुंबई : अंधेरी पूर्वेत ३ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथे होत असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान पार पडणार आहे. या अनुषंगाने उपनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सार्वजनिक सुट्टी '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे प्रशासनाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या दिवशी केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना देखील ही सुट्टी कायम राहणार आहे.
मतदान करा ; प्रशासनाचे आवाहन
अंधेरी पूर्वेत होत असलेल्या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनातर्फे विशेष तयारी केली जात आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्यात येत असून विविध उपाययोजना उपनगर जिल्ह्ग प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत. यावेळी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.