मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे . या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ७ जानेवारी रोजी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली होती .त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह, मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, टास्क फोर्सचे सदस्य आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याचा ताण रुग्णालयावर पडत नसल्याने लगेच मोठा निर्णय घेण्याची गरज नसल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत झाले आहे. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने नवीन नियमावली रात्री जाहीर झाली नाही. मात्र, या चर्चेनंतर आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली.
नवीन निर्बंध पुढीलप्रमाणे
- रात्री ११ ते पहाटे ५ संचारबंदी
- मैदानं, उद्यानं, पर्यटन स्थळ, जिम, स्विमिंग पूल, ब्युटी सलून पूर्णतः बंद
- हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत राहणार सुरु
- शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
- नाट्यगृहे,सिनेमागृह ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार
-पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं वाहतूक करण्यास मुभा
-हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
- हॉटेल्स रेस्टॉरंटमध्येही पूर्ण लसीकरणं झालेल्यांनाच प्रवेश, होम डिलीव्हरी सेवा पूर्णवेळ सुरु राहणार
- महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआर चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
- दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांच्या दोन्ही कोविड प्रतिबंधक लसी झालेल्या असणं बंधनकारक
- एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल
-२४ तास सुरु राहणारी कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडली जाणार
- लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार