मुंबई : महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद रंगला आहे. नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर टीका करत, "त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. पटोलेंच्या पोटात होते ते ओठांवर आले का?" असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे की, "नाना पटोले यांना बोलताना अजिबात भान राहत नाही. त्यांची पुन्हा एकदा जीभ घसरली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात ‘वध‘ केला अशा प्रकारचे निंदनीय वक्तव्य करणाऱ्या पटोलेंचा मी निषेध करतो. पटोले यांच्या पोटात जे होते तेच त्यांच्या ओठांवर आले का?" अशी टीका त्यांनी यावेळी केली. "नाना पटोले यांनी देशवासीयांची माफी मागावी." असेदेखील त्यांनी मागणी केली आहे.