मुंबई : देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त शुक्रवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. मात्र, लतादीदींची प्रकृती स्थिर असून अफवा पसरवू नका, असे आवाहन मंगेशकर कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेव्हापासून अनेकांनी त्यांचा निधनाबद्दल खोट्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती. अखेर कुटुंबियांकडून अशा खोट्या बातम्या पसरवू नये, असे सांगण्यात आले आहे.
लतादीदींच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. "कृपया खोट्या बातम्या पसरवू नका. लतादीदी आयसीयूमध्ये आहेत, त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि टीमकडून उपचार सुरू आहेत. त्या लवकरात लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात, यासाठी प्रार्थना करूया", असे आवाहन निवेदनातून करण्यात आले आहे.