सत्तापिपासू राजकारण्यांचा निषेध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Aug-2021   
Total Views |

Pramod Sawant_1 &nbs
२५ जुलै रोजी गोव्याच्या बीचवर उशिरा रात्री दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाला. आरोपींना अटक झाली. या घटनेवरून गोव्यात विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात रान उठवले. यावेळी गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, “केवळ सरकार आणि पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. १४-१५ वर्षांच्या मुली रात्रभर बीचवर थांबत असतील, तर पालकांनी विचार करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना बाहेर सोडताना पालकांनीही जबाबदारी घ्यावी.” एक गोष्ट आहे की, पोलीस आणि सरकार यांचे कर्तव्य आहे की, त्यांच्या कार्यकाळात जनता सुरक्षित असावी. पण, प्रमोद सांवत जे म्हणाले त्यात तथ्य आणि सत्यही आहे. आज उच्चभ्रू घरातच का? सर्वसामान्यांच्या घरातही सध्या वातावरण काय आहे? व्यक्तिस्वातंत्र्याचे अति समर्थन करत काहीही करा. पण, जे काही कराल ते आमच्यापर्यंत येऊ देऊ नका, अशी भूमिका पालक मुलांबाबत घेताना दिसतात. मुलांना जन्म देऊन दुर्लक्ष करायचे, असे पालकत्वाचे प्राणियुग अवतरले का? आता या विधानावर भुवया वक्र होतीलही; पण सत्य आहे. पडदा युग किंवा ७च्या आत घरात उबंरठ्यातले जगणे कुणालाच नको, ना मुलाला, ना मुलीला. मुलींनी बीचवर रात्री-अपरात्री फिरू नये का? तर जरूर फिरावे. पण, आपली काळजी घेत. कारण, कायदा सुव्यस्था कितीही असली तरी राक्षसी प्रवृत्ती पूर्णत: मरत नाहीत. प्रमोद सावंत यांनी पालकांनी अपत्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे म्हणणे म्हणजे मानवी अधिकाराचे उल्लंघन आहे का? कारण, या विधानावरून शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे सांवतांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार आहेत. गोर्‍हेंनी दिशा सालियान आणि पूजा चव्हाण यांच्याबाबतीतही मत मांडावे. आताही या निष्पाप अल्पवयीन मुलींच्या हक्काबाबत जर त्यांनी भूमिका मांडली असती तर? पण नाही, नीलम गोर्‍हे आणि विरोधकांना त्या मुलींवरील अत्याचारापेक्षा रस आहे राजकारणाच्या चिखलात. बलात्काराची ही घटना भयंकर आहे. घटनेचा निषेध तर आहेच; पण या असल्या सत्तापिपासू राजकारण्यांचाही निषेध.

साहेबच ‘पीएम’ होणार!

आमच्या सायबांना तेवढं पंतप्रधान करा. ते तिथे गेले तर जागा खाली होईल ना इथली. आमचा पण जरा विचार करावा. मला तर बुवा सगळा डायलॉग पाठ आहे. आमची चूक असतानाही कुणी आम्हाला काही बोलले की, आम्ही म्हणतो महाराष्ट्राचा अपमान! मराठी अस्मितेचा अपमान!! मग कसं सगळं थंड थंड होतं. तर मुद्दा असा की, यांना देशाच्या राजकारणात न्या हो. ते काही काही करणार नाहीत. करणार नाहीत म्हणजे शांत बसतील. मोठ्याधाट्यांचे ऐकतील. आता जसे मोठ्या काकांचे ऐकले ना? तसे. काका म्हणाले, “ज्यांचा संबंध नाही, त्यांनी दौरे करू नयेत,” तर यांनी ऐकले ना? तर साहेबांना पंतप्रधान बनवाच! काय म्हणता, काका इतकी वर्षे भावी पंतप्रधान आहेत? तर काकांना पण राहू द्या ना उमेदवार, हवे तर मॅडमच्या अत्यंत हुशार, बुद्धिमान गोड लेकराला पण राहू द्या उमेदवार म्हणून. आपलं काय जातं? साहेब ‘पीएम’ झाले की, आनंदी आनंद. बघा महाराष्ट्रात. ‘ओबीसी’ आरक्षण रद्द झाले, मराठा आरक्षण रद्द झाले, कोरोनाने लोक देशोधडीला लागले. पण, झाले का कुठे काय? मग आमची सत्ताकारणाची पद्धतच तशी आहे. कुणी हू का चू करेल, तर कोथळा, वाघनखं आणि काय काय... म्हणजे शब्दात हो, शब्दात आहेत आमच्या. काय म्हणता, सगळा देश सुखात असताना महाराष्ट्र सध्या कायम संकटात असतो? यांना देशाच्या राजकारणात पाठवून महाराष्ट्राची सुटका करा म्हणता? असू दे, असू दे, त्यासाठी तरी करा ना पंतप्रधान त्यांना. करा ना म्हणजे मग महाराष्ट्राची खुर्ची खाली होणार. मग कोण ‘सीएम’ होणार? मला तर वाटते मीच! काय म्हणता, कुणीही नाही. तर तेच पुन्हा येणार? येऊ द्या कमळवाल्यांना. पण, तरीही ‘पीएम’ आमचे साहेबच होणार! मला बोललेच पाहिजे. रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा सांगतो, साहेबच ‘पीएम’ होणार!
 
 
@@AUTHORINFO_V1@@