प्रदूषण आणि ‘कोरोना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jul-2021   
Total Views |

corona_1  H x W
 
 
मागील वर्षभरापासून अवघ्या जगावर कोसळलेले कोरोना महामारीचे संकट अद्याप संपलेले नाही. या जगभरात थैमान घालणार्‍या विषाणूचे दररोज नवनवे स्वरूप जगासमोर येत असून परिणामस्वरूप ‘भय इथले संपत नाही’ अशीच एकूण स्थिती. त्यातही या विषाणूसंबंधी, आजाराविषयी रोज नवनवीन संशोधने प्रकाशझोतात येत असतात. त्यापैकी काही सर्वसामान्यांना दिलासा देणारी असतात, तर काही या विषाणूबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अधिकच धडकी भरवणारी. पण, एक मात्र नक्की की, कोरोना विषाणूवरील हे संशोधन आगामी काळात जसजसे अधिकाधिक व्यापक स्वरूप धारण करेल, त्याचा मानवजातीला निश्चितच फायदा होईल. कारण, जेव्हा या विषाणूच्या छायेत अख्खे जग ओढले गेले, तेव्हा सर्वसामान्यांपासून ते अगदी शास्त्रज्ञांनाही या विषाणूच्या संरचनेची, त्याच्या परिणामांची फारशी कल्पना नव्हती. परंतु, अगदी अल्पावधीत शास्त्रज्ञांनी या विषाणूवर सखोल, परिपूर्ण संशोधन करून त्यातील बारकाव्यांचा कसून अभ्यास केला. इतकेच काय तर या महामारीपासून जगाला वाचवायचे असेल तर लसीची नितांत गरजही या संशोधकांनी वेळीच ओळखली आणि त्यादृष्टीने दिवसरात्र अगदी झोकून देत काम केल्याने कोरोनावर परिणामकारक लसी जगभर उपलब्धही झाल्या. पण, लसनिर्मिती झाली म्हणजे संशोधनाला पूर्णविराम मिळाला, असे अजिबात नाही. लसींवर तर अजून कसून संशोधन जोमात सुरू असून कोरोना विषाणूवरील संशोधनही सुरूच आहे. असेच एक संशोधन नुकतेच उजेडात आले असून, त्यामुळे सर्वसामान्य आणि खासकरून शहरवासीयांच्या चिंतेत किंचित भर पडू शकते.
 
 
 
आधी म्हटल्याप्रमाणे कोरोनावर विविध स्तरावर संशोधन सुरू आहे. त्यातलाच एक विषय म्हणजे कोरोना विषाणू आणि प्रदूषणाचा संबंध. वरकरणी कदाचित कोरोना आणि प्रदूषण हे एकमेकांपासून पूर्णत: भिन्न आहे, असे वाटेल. पण, एका नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून या समजाला मात्र छेद दिलेला दिसतो. या नवीन संशोधनानुसार, एखाद्या भागात प्रदूषण वाढीस लागल्यानंतर त्या भागातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’चा दरही वाढल्याचे संशोधनाअंती निष्पन्न झाले. ‘Journal of Exposure Science and Environmental Epidemiology’ने केलेल्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूच्या प्रसारात प्रदूषणाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. ‘डेझर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट’ने अमेरिकेच्या नेवाडा राज्यातील रेना भागात यासंबंधीचे संशोधन हाती घेतले होते. हा तोच परिसर आहे, जिथे कॅलिफोर्नियातील जंगलांना लागलेल्या आगीमुळे लागलेल्या प्रदूषणाचा परिणाम तीव्रतेने दिसून आला होता. जेव्हा या भागात प्रदूषणाची पातळी वधारली होती, तेव्हा या भागातील कोरोना ‘पॉझिटिव्हिटी’च्या दरातही एकूणच वृद्धी नोंदवण्यात आली. तेव्हा केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रदूषण ज्या काळात वाढत होते, त्याच काळात कोरोनाच्या रुग्णसंख्येतही १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
 
 
 
पश्चिम अमेरिकेत वणवा लागण्याच्या जवळपास ८० घटना गेल्या काही काळात निदर्शनास आल्या. या वणव्यांची तीव्रता इतकी भीषण होती की, त्यातून निघालेला धूर हा थेट न्यूयॉर्क शहरापर्यंतही पोहोचला होता. नेमके याच दरम्यान अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे या सर्वेक्षणात विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर या वणव्याच्या आगीमुळे दूरदूरपर्यंत हवेत पसरलेल्या २.५ मायक्रोमीटरच्या छोट्या कणांमध्येही शास्त्रज्ञांना कोरोनाचे नव्या प्रकारचे विषाणू दिसून आल्याचे समजते. या अभ्यासात सहभागी असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’चे केंट पीकरटन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढते तापमान, आर्द्रता यांचाही कोरोना प्रसाराशी थेट संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. तसेच या सर्व घटकांमुळे कोरोनाच्या विषाणूला मानवी शरीरात प्रवेश करण्यासाठी अधिक पोषक वातावरण निर्माण झाल्याचाही दावा या संशोधकांच्या चमूने केला आहे.
 
 
 
खरंतर प्रदूषण आणि कोरोनाचा परस्पर संबंध अधोरेखित करणारा हा काही पहिला आणि शेवटचाही शोध नाहीच. यापूर्वीही तुर्कीमध्ये झालेल्या एका संशोधनात याविषयीचा अहवाल जाहीर करण्यात आला होता. भविष्यातही कोरोना आणि प्रदूषणाचे हे कनेक्शन किती घट्ट आहे, त्याची शास्त्रीय पातळीवर चिकित्सा होईलच. पण, तोपर्यंत आपण निर्धास्त न राहता, कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे पालन तर करायलाच हवे, शिवाय लसीकरणासाठीही तितकीच तत्परता दाखवून स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबीयांना सुरक्षित ठेवणे, हेच आपले आद्यकर्तव्य.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@