नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या अनेक सामन्यांमध्ये त्याचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी अनेक चाहते आपण पाहिले आहेत. अनेकांनी त्यांच्या पद्धतीने सचिनचा सर्वोत्तम चाहता असल्याचे सिद्ध केले आहे. मात्र, आता सचिन तेंडूलकरचा एका सुप्रसिद्ध चाहता म्हणजे सुधीर कुमार यांनी चक्क त्याचे मंदिर बांधण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांनी मुजफ्फरपुरमध्ये सचिन तेंडूलकरचे मंदिर बांधणार असल्याचे घोषित केले आहे. तेही कोणतीही देणगी न घेता, स्वतःच्या पैश्यातून तो हे काम करणार असल्याचेदेखील सांगितले आहे.
सुपर फॅन सुधीरकुमार यांनी सांगितले की, "कांटी येथील दामोदरपुर येथे मंदिर बांधण्यासाठी मी जागा शोधत आहे. जर काही कारणास्तव जागा सापडली नाही तर मुजफ्फरपूरमध्येच जागा शोधून मंदिर बांधेन. किमान ४ वर्षात हे मंदिर तयार होईल. सचिन तेंडूलकर यांना सन्मानाने बोलावू आणि ते येतील अशी मला आशा आहे." असे मत व्यक्त केले. पुढे सुधीर यांना मंदिर बांधण्यासाठी देणगी गोळा करणार का? असे विचारले असता त्यांनी ते नाकारले. ते म्हणाले की, "मंदिर आपल्या स्वत: च्या पैशाने बांधले जाईल. कारण ते माझे स्वप्न आहे आणि ते मी प्रत्यक्षात पूर्णही करेन." असा दृढनिश्चय त्यांनी केला आहे.
पुढे सुधीर कुमार यांनी सांगितले की, "सचिन तेंडुलकरच्या माध्यमातूनच मला देश-विदेशात ओळख मिळाली. जेव्हा जेव्हा मी दक्षिण भारतात जातो तेव्हा मी सुपरस्टार रजनीकांत यांचे मंदिर पाहतो. कोलकाता येथे काही वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांचे मंदिर बांधले गेले होते. तिथेच मला याची प्रेरणा मिळाली आणि मी ठरवले की काहीही झाले तरी मंदिर नक्कीच बांधणार."