मुंबई: पेट्रोल, डिझेल आणि इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस सध्या देशभरात केंद्र सरकारविरोधी आंदोलन करत आहे. आज दि.१० रोजी काँग्रेसने मुंबईतही अशाच प्रकराच्या जनआंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान एक विचित्र घटना घडली. या आंदोलनामध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी आणलेली बैलगाडी अचानकपणे तुटल्याचा हास्यास्पद प्रकार घडला. या घटनेमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह कार्यकर्ते बैलगाडीवरुन खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी भाई जगतापांना "तोल सांभाळा !" असा सल्लाच दिला आहे.
याबाबत ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, "तोल सांभाळा! भाई जगताप महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा," असेही ते म्हणाले.
दरम्यान, या बैलगाडीवर उभे राहून काँग्रेस कार्यकर्ते तसेच भाई जगताप केंद्र सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच “देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो !” अशासुद्धा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त लोक या बैलगाडीवर चढल्यामुळे ती जागेवरच तुटली. परिणामी बैलगाडीमध्ये असणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्यकर्ते बैलगाडी अचानकपणे तुटल्यामुळे जमिनीवर कोसळले. ही घटना घडतानाचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेवर भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करुन भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.