संघाचे सहाही सरसंघचालक पाहिलेले ज्येष्ठ स्वयंसेवक वसंतराव बहुळकर शतायुषी वर्षात!

    09-Jun-2021
Total Views |

Vasantrao Bahulkar_1 
 
 
संघ संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांना पाहिलेले व त्यांचा परिसस्पर्श लाभलेले वसंतराव बहुळकर हे आज, दि. १० जून रोजी शतायुषी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन...
 
 
प्रसंग १ मे, २०१८चा!
 
 
“अरे सुधाकर, मला कार्यक्रमास नेण्यासाठी दुपारीच लवकर ये. ‘स्नेहानंद मेळावा’ असला, तरी संघ स्वयंसेवकांचा कार्यक्रम आहे. गणवेश घ्यावा लागेल. वेळेवर ये.” फोनवर पलीकडची वयोवृद्ध व्यक्ती मला सांगत होती.
 
 
मी उत्तरलो, “मामा, संघाचा कार्यक्रम असला तरी गणवेश अपेक्षित नाही. शिरूरहून पुण्यास मी दोन तासांत पोहोचतो. अगदी वेळेवर. चिंता नको.”
 
 
हा संवाद होता आजचे ख्यातकीर्त चित्रकार सुहास बहुळकर यांचे वडील बापू उर्फ वसंतराव बहुळकर आणि माझ्यामधील. हा प्रसंग सांगण्याचा हेतू हा की, ९७ वर्षीय वसंतराव यांच्यात ओतप्रोत भरलेली संघ शरणवृत्ती मला दृगोचर झाली.
 
 
संघ संस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांना पाहिलेले व त्यांचा परिसस्पर्श लाभलेले वसंतराव बहुळकर हे आज, दि. १० जून रोजी शतायुषी वर्षात पदार्पण करीत आहेत. संघ संस्थापकांना प्रत्यक्ष पाहिलेले आणि हयात स्वयंसेवक दुर्मीळ आहेत. त्यापैकी वसंतराव बहुळकर एक.
 
 
रामचंद्र नारायण बहुळकर व जानकीबाई बहुळकर यांच्या पोटी दि. १० जून १९२२ रोजी वसंतराव यांचा जन्म कसबा पेठ, पुणे येथे झाला. त्यांना एक कलाताई नावाची मोठी बहीण होती. बहुळकर हे मूळचे बहुल, ता. खेड, जि. पुणे, येथील रहिवासी असून बर्‍यापैकी शेती व घर बाळगून होते. परिवारही एकत्र मोठा होता. रामचंद्र बहुळकर म्हणजे त्याकाळी संगीत क्षेत्रातील कीर्तिमान पेटीवादक असलेले रामभाऊ बहुळकर होत. वडिलांविषयी एक आठवण वसंतराव नमूद करतात - १९७०च्या दशकात ते व उगवता चित्रकार मुलगा चि. सुहास याला घेऊन, थोर शास्त्रीय गायिका हिराबाई बडोदेकर व पंडित हुसेन खान यांच्याकडे गेले असता, रामभाऊंचा अत्यंत आदराने, गायनाच्या शैलीत बसून कानावर हात ठेवून, त्यांच्या पेटीवादनाकरिता उभय कलाकारांनी आदर व्यक्त केला. रामभाऊ यांचे पेटीवादनाचे वर्ग मुंबईतही प्रसिद्ध असल्याचे जाणकार सांगत असत. तथापि, नियतीची इच्छा काय असते, हे कळत नसते. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना रामभाऊ यांना प्रपंचाची विरक्ती निर्माण झाली. अचानक घरातून निघून गेले आणि लहानगा वसंता, कलाताई पितृछत्रास वंचित झाले. कुटुंबाची बिकट संघर्ष गाथा सुरू झाली. भरीस भर म्हणून वसंत सात-आठ वर्षांचा असताना ते ज्या घरात राहत होते. (कसबा पेठ, शिराल शेठ मंदिराच्या आसपास) अंगणात झोपलेले असता राहत्या घराची भिंत रात्री कोसळली. भिंतीखाली वसंता व त्यांचे काका गाडले गेले. या अपघातात काका गेले. मात्र, वसंतराव वाचले. पण, घरावरच्या पत्र्याने त्यांचा पाय आरपार कापला गेला. आजही त्यांच्या पायावरचा व्रण साक्ष देतो! अशा अकल्पनीय स्थितीत आई जानकी, काकू, बहीण कलाताई व वसंतराव यांची जिकिरीची वाटचाल सुरू झाली. कधी बहुलला वडिलोपार्जित शेती वा पुण्यात लहान-मोठी कामे या आधारे वाटचाल सुरू होती. याच सुमारास वसंतरावांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेशी (बहुदा महादजी शाखा) आला तो आजपर्यंत! त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. ते मॅट्रिकसुद्धा होऊ शकले नाहीत. संघकाम व लहान-मोठे उद्योग करीत राहिले.
 
 
1947च्या सुमारास घरात बखेडा निर्माण झाला. चुलते म्हणाले, “वसंता, संघ सोडा वा घर सोडा.” तरुण वसंतरावांनी घर सोडण्याचा निर्णय स्वीकारला व संघाचा मार्ग धरला. ओंकारेश्वर मंदिरात दोन दिवस काढले. त्यावेळचे ज्येष्ठ स्वयंसेवक नाना लिमये यांनी वसंतरावांना चांगला आधार दिला. त्यांच्या मदतीने वसंतरावांनी ‘टर्नर’चा कोर्स पूर्ण केला. दापोडी येथील ‘पीडब्ल्यूडी’च्या शासकीय यंत्र शाळेत वसंतरावांना ‘टर्नर’ची नोकरी मिळाली. आता त्यांच्या जीवनात दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली. बहीण कलाताई लग्न होऊन पाचंग्रीकर कुटुंबात गेली. पाचंग्रीकर विश्रामबाग वाड्याला मागे लागून असलेल्या वाड्यात राहत. बहिणीकडे वसंतरावांचे सतत जाणे-येणे असे. मेव्हणे दादा पाचंग्रीकर यांची भाची असलेल्या सुशीला क्षीरसागर हिच्याशी वसंतरावांचे प्रेमसूर जुळले. १९५२ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. या विवाहाचे वर्णन करावयाचे झाल्यास ’एकादशी घरी शिवरात्र’ असेच करावे लागेल.
 
 
यावरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते. वसंतमामा गंमतीने सांगतात, “माझ्या एका संघमित्राने ’केळवण’ केले. सायंकाळी डझनभर केळी घेतली व आम्ही एका मंदिराच्या कट्ट्यावर बसून तो प्रसंग साजरा केला. विवाहानंतर या ‘वसु’ दाम्पत्याची (वसंत-सुशीला) आई जानकी काकूसह पेरुगेटजवळील केळकर वाड्यात छोट्या खोलीत सहजीवनाची सुरू झाली. वसंतराव यांच्या जीवनातील संघर्ष हळूहळू कमी होत गेला. दि. ११ सप्टेंबर हा दिवस हिंदू धर्माची जगाला ओळख करून देणार्‍या स्वामी विवेकानंदांनी ख्यातकीर्त केला. याच दिनांकाला 'वसु’च्या प्रपंचवेलीवर ११ सप्टेंबर, १९५४ दिनी बाल सुहास यांचे आगमन झाले. नवजात शिशु बालक भविष्यात ’सुविख्यात’ होणार असे भाकीत या दिवसाने दर्शविले असे आज वाटतेय! दोन वर्षांनी कन्या सुषमाचे आगमन झाले. यथावकाश वसंतरावांचा प्रपंच स्थिरावत गेला, सुखाकडे वाटचाल सुरू झाली. वसंतरावांना पत्नी सुशीला मामींची मौलिक साथ या यशात समाविष्ट आहेच.
 
 
जीवनयापन कालक्रमाने वसंतरावांनी स्वतःचे छंद - फोटोग्राफी व चित्रकला चांगली जोपासली. ते स्वभावतःच एक सर्जनशील चित्रकार आहेत. सुट्टीच्या दिवशी लहानग्या सुहासला घेऊन पुण्याच्या आसपास निसर्गरम्य स्थानी भटकंती करीत व विविध निसर्गचित्रे, स्केचेस काढीत. मात्र, मुलगा सुहास याच्या हातात कला आहे, हे लक्षात येताच वसंतरावांनी स्वतःची आवड आवरती घेतली. सुहासच्या या क्षेत्रातील प्रगतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. आज सुहास बहुळकर कलाविश्वातील ख्यातकीर्त चित्रकार, कलावंत आहेत, हे सर्वविदीत आहेच! दरम्यान, मुलगी सुषमा लग्न होऊन सासरी गेली. सुहास-साधना विवाहबद्ध झाले. सूनबाईही उत्तम चित्रकार व समीक्षक आहेत. नातवंडे-पंतवंडे पाहिली. खर्‍या अर्थाने वसंतराव आणि सुशीला यांचा प्रपंच नेटका झाला. समाधानाचे सुखाचे दिवस आले.
 
 
‘कृतकृत्य झालो। इच्छा केली पावलो॥’ असाच ’कृतकृत्यतेचा’ भाव उभयतांचा असणार!
 
 
वसंतराव माझे मामा होत. पण, सुहास-सुषमांचे ‘बापू’ म्हणून ते संघ परिवारात व परिचितांमध्ये ’बापू’ याच नावाने सर्वदूर ओळखले जातात. गेली ६५ वर्षे मी त्यांना जवळून पाहत आलो आहे. आपत्ती येवो वा कसलाही बिकट प्रसंग असो, वसंतमामांच्या मुखावरचे हास्य कधीही मावळले नाही की मनाची स्थिरता ढळलेली नाही. “हे कसं काय जमतं तुम्हाला?” असं विचारल्यावर म्हणाले, “सुधाकर, मी पू. डॉ. हेडगेवार यांना पाहिले, ऐकले! त्यांच्या ठायी समाजाविषयी ओतप्रोत भरलेल्या आत्मीयतेची प्रचिती अनुभवली. माझ्या मनातील निर्मलता, द्वंद्व नाहीसे झाले. संघ सांगेल ते काम करण्याची शरणता, समर्पणभाव आपोआप माझ्यात आला.” ‘संघ स्वयंसेवक होतो’ अशी सांगण्याची पाळी यायला नको, हा संघ संस्थापकांचा मंत्र कायमचा त्यांच्या हृदयावर कोरलेला आहे. पू. श्रीगुरुजी, मा. बाळासाहेब देवरस, मा. रज्जूभैय्या, मा. सुदर्शनजी, विद्यमान मा. डॉ. मोहनजी भागवत यांना त्यांनी पाहिले, ऐकले. खरं म्हणजे हा सर्व संघसंस्कार! असाच भाव त्यांच्या अंतःकरणात विद्यमान असतो. आयुष्यभर श्रद्धापूर्वक हृदयातील भक्तिभाव जपत आणि निष्ठापूर्वक संघविचाराची त्यांनी पूजा केली. ‘जन्मा आलो त्याचे। आजी फळ झाले साचे।’ हाच कृतकृत्यतेचा भाव वसंतरावांच्या मनी वसत असणार. सर्व सरसंघचालकांना पाहण्याचे भाग्य वसंतराव बहुळकर यांना लाभले. हे ’अहो भाग्य’ आहे!
 
 
श्रद्धा, भक्ती, समर्पण या तीन नैतिक मूल्यांनी सामावलेले बापूंचे जीवन सार्‍या समाजाला व स्वयंसेवकांना प्रेरित करेल, यात शंकाच नाही. वसंतराव बहुळकर नामक संघ कर्मयोग्यास शतायुषी वर्षात प्रदार्पण करीत असताना अभीष्टचिंतन करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्मशताब्दी सोहळा त्यांनी डोळ्यांनी पाहावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. ही दुर्दम्य इच्छा श्रीरामकृपेने पूर्ण होईल, हे निश्चित!
 
 
- सुधाकर पोटे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121