‘मॉर्निंग कन्सल्ट’ने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगातील सर्वाधिक पसंतीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. यानिमित्ताने मोदींच्या यशाचे रहस्य असलेल्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ नीतीचा परामर्ष...
‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ हा ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाचा वारसा सांगणारा संदेश देत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी आपल्या ज्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्याची सप्तवर्षपूर्ती नुकतीच पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या या संदेशाचा गेल्या सात वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्षणभर विसर पडलाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या संदेशापासून तसूभर दूर गेले आहेत, असं कधीही जाणवलं नाही आणि भविष्यात तसे होईल याची सुतराम शक्यता दिसत नाही. ‘सब का’ याचा अर्थ कुठलाही भेदाभेद न करता!
हा संदेश जसा भारताच्या शेजारी देशांसाठी होता, तसा तो जगभरातील सर्व देशांसाठीही होता. हा संदेश जसा भारतातल्या तमाम वाड्या, वस्त्या, झोपड्यांसाठी होता, तसा तो भारतातल्या तमाम गावं, शहरं, महानगरं यांच्यासाठीही होता. हा संदेश जसा भारतातल्या तमाम प्रांतप्रदेशांसाठी होता, तसा तो अखंड अखिल भारतवर्षासाठीही होता. हा संदेश जसा देश-विदेशातील अल्प-अत्यल्पसंख्यकांसाठी होता, तसा तो बहुसंख्यकांसाठीही होता. हा संदेश जसा तमाम विरोधी पक्षांसाठी होता, तसा तो सत्ताधारी-सहयोगी-तटस्थ पक्षांसाठीही होता.
हा संदेश जसा भारतीय प्रसारमाध्यमांसाठी होता, तसा तो आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठीही होता. हा संदेश जसा ग्रामपातळीवरील परंपरागत ग्रामकारागिरांसाठी होता, तसा तो आधुनिक कार्पोरेट जगत-बहुराष्ट्रीय उद्योगजगतासाठीही होता. हा संदेश जसा समाजसेवाकार्यात गुंतलेल्या व्यक्ती-संघटना यांच्यासाठी होता, तसा तो विदेशी मदतीवर चालणार्या ‘एनजीओज’-मिशनरीज यांच्यासाठीही होता. हा संदेश जसा देश-विदेशात कार्यरत असलेल्या अवाढव्य शासकीय-निमशासकीय यंत्रणांसाठी होता, तसा तो त्याहूनही अवाढव्य असलेल्या अशासकीय-स्वायत्त-खासगी यंत्रणांसाठीही होता. हा संदेश जसा शस्त्रशास्त्रोजारधारकांसाठी होता, तसा तो हलोजारधारकांसाठीही होता. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत प्रत्येकाच्या कल्याणाचा संदेश, ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ हा संदेश जे भारतासोबत आहेत त्यांच्यासाठी जसा होता, तसा तो जे भारतासोबत नाहीत त्यांच्यासाठीही होता.
तुम्ही भारतासोबत यावे म्हणून भारत प्रामाणिक प्रयत्न करील, तुम्ही भारतासोबत यायला तयार असाल तर भारत तुम्हाला साथ द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करील. हा संदेश जसा भारताच्या विकासयात्रेत सहभागी असलेल्यांसाठी होता, तसा तो भारताच्या विकासयात्रेत सहभागी नसलेल्यांसाठीही होता. तुम्ही भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हावे म्हणून भारत प्रामाणिक प्रयत्न करील, भारताच्या विकासयात्रेत सहभागी व्हायची तुमची इच्छा असेल तर भारतही तुमच्या विकासप्रक्रियेला सक्रिय हातभार लावायचा प्रामाणिक प्रयत्न करील. हा संदेश जसा भारतावर ठाम विश्वास असलेल्यांसाठी होता, तसा तो भारताविषयी मनात धाकधूक असलेल्यांसाठी, भारताविषयी विश्वास नसलेल्यांसाठीही होता. भारताविषयी तुमच्या मनात विश्वास निर्माण करायचा भारत आटोकाट प्रयत्न करील, भारताच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवायची तुमची प्रामाणिक इच्छा असेल तर तुमच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवायचा भारतही आटोकाट प्रयत्न करील.
विश्वासातून साथ आणि त्यातून विकास! एकमेकांवरील दृढविश्वासातून साथसंगत, मैत्री अधिक घट्ट होत जाईल आणि त्यातून उभयतांचा चौफेर विकास साधला जाईल. एवढा व्यापक हेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या त्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ संदेशात सामावलेला आहे. ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ!’ स्वतःच्या विकासासाठी इतरांच्या विकासाला यथाशक्ती हातभार लावावा लागेल, इतरांच्या विकासाला हातभार लावावयाचा असेल तर त्यांची साथसंगत करावी लागेल आणि त्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, इतरांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करावा लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतरांसाठी दिलेला हा संदेश त्यांनी स्वतःसाठी एक खडतर वसा म्हणून अंगीकारलेला आहे. भारताविषयी आणि सत्तेवर येणार्या आपल्या सरकारविषयी शेजारी देशांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशियायी क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांवर विश्वास दाखवून पाकिस्तानसह त्यांना आपल्या शपथग्रहण सोहळ्यासाठी सन्मानाने आग्रहाने आमंत्रित केले होते. या, क्षेत्रीय सहकार्यातून ‘सब का विकास’ साधूया! काबुलहून मायदेशी परतत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाट वाकडी करून पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या घरच्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झाले, तेही तसा कुठल्याही प्रकारचा निरोप-आमंत्रण नसताना! जीव धोक्यात घालून कशासाठी गेले तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी? भारताविषयी, भारतीयांविषयी, मोदी सरकारविषयी पाकिस्तानच्या, पाकिस्तानी जनतेच्या, नवाझ शरीफ सरकारच्या मनात विश्वास निर्माण करावा, दोन्ही देश अधिक जवळ यावेत आणि परस्पर सहकार्यातून दोन्ही देशांनी आपापला चौफेर विकास साधावा म्हणून! इमरान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आरूढ होताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन शांतता, सहकार्य, विकास प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता, ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ संदेश दिला होता.
भारताचा आजचा दुसरा शेजारी चीन! ‘आजचा शेजारी’ एवढ्यासाठी म्हटले की, कधी तरी तिकडे हजारो मैल दूर असलेला चीन भारताचे पहिले कबुतरशांतीप्रिय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या राजवटीत भारताच्या शेजारी शिरोभागी येऊन बसला. याच जवाहरलाल नेहरूंच्या राजवटीत चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजार्यांनी भारताचा हजारो वर्ग किलोमीटर भूप्रदेश बळकावला आहे, जो आजतागायत त्यांच्याच ताब्यात आहे. तरीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे पाताळयंत्री सर्वेसर्वा शी जिनपिंग यांना दोनदा भारतभेटीवर बोलावून, ‘अतिथी देवो भव’ हा सनातनी संस्कार जपत त्यांचे यथोचित स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही चीन भेटीवर जाऊन आले. कशासाठी? आपल्या शेजारी देशाशी मैत्रीपूर्ण शांतता सहकार्यातून परस्परांच्या विकासाला चालना देण्यासाठी! कुठल्याही अविस्तारवादी देशाला आपले शत्रू-मित्र बदलता येतात. पण, शेजारी मात्र बदलता येत नाहीत.
दुर्दैवाने ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ हा विश्वकल्याणकारी संदेश चीन, पाकिस्तान आणि भारतातला काँग्रेस परिवार या त्रिकुटाने कधी गांभीर्याने घेतलाच नाही. चीन आणि पाकिस्तान यांनी मोदी सरकारपेक्षा काँग्रेस परिवारावर अधिक विश्वास ठेवला, काँग्रेस परिवारानेही मोदी सरकारपेक्षा चीन आणि पाकिस्तान यांच्यावर अधिक विश्वास ठेवला. अगदी परवा-परवापर्यंत पाकिस्तानचे पालकत्व स्वीकारलेल्या, भारतावर, संघपरिवारावर टोकाचा अविश्वास असलेल्या अनेक अरब-इस्लामिक देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ हा संदेश समजावून सांगू शकले; त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यात भारताविषयी, भारत सरकारविषयी विश्वास निर्माण करू शकले; त्यांच्या विकासात भारताची हमी देत भारताच्या विकास प्रक्रियेत त्यांना सोबत घेऊ शकले. चीन, पाकिस्तान आणि काँग्रेस परिवार त्रिकुटाबाबत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले नाही. कारण, या त्रिकुटातील काँग्रेस परिवाराचा दारुण पराभव करून एक सामान्य चायवाला खणखणीत बहुमताने भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला आहे, हे शल्य या त्रिकुटाला सतत बोचणी, डागणी देत आहे! काँग्रेस परिवारातील एक क्षत्रपी ममता बॅनर्जी तर नरेंद्र मोदी यांना भारताचा पंतप्रधान मानायलाच तयार नाही! दुसरे क्षत्रप अखिलेश यादव हे मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे तयार झालेली स्वदेशी ‘कोविड’ लस टोचून घ्यायलाच तयार नाहीत, “मोदी-भाजप की लस, हम नही लगायेंगे जी?” सगळा काँग्रेस परिवार एका नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीचा एवढा द्वेष-तिरस्कार का करतोय? कारण, नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत, राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत, साधुसंत-ऋषिमुनी परंपरेचे प्रतीक आहेत! “मोदीजी, अगर तुम भी बुरे होते, तो हमे कोई तकलीफ न होती जी!”
चीन-पाकिस्तानशी भारतातल्या काँग्रेस परिवाराचे सख्य फार जुने आहे. संयुक्त राष्ट्रसंघातलं चीनचं जे महत्त्वपूर्ण स्थान आहे, ती नेहरू-काँग्रेस परिवाराचीच मेहरबानी आहे. ज्या काँग्रेस परिवाराने भारतीय सनातनी परंपरा, सभ्यता, संस्कार, संस्कृती यांच्याशी कधीही सामंजस्य दाखविले नाही, त्या काँग्रेस परिवारातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २००८ साली चीनच्या कम्युनिस्ट पार्टीशी म्हणजेच शी जिनपिंग सरकारशी परस्पर सामंजस्य करार केला आहे. भारताला अंधारात ठेवून सोनिया-राहुल काँग्रेसने चीनशी केलेल्या त्या गोपनीय करारात काय दडले असेल? भारतातले चीनचे ‘डीप अॅसेट्स’ म्हणून काँग्रेस परिवार काम करीत असेल का? डोकलाम सीमेवर चीन धुमाकूळ घालत असताना युवराज राहुल गांधी हे भारतातल्या चिनी दूतावासात मध्यरात्री शिळोप्याच्या गप्पा मारायला गेले असतील का? काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जातात आणि भारतातले मोदी सरकार हटविण्यासाठी पाकिस्तानने काँग्रेस परिवाराला सहकार्य करावे, असा जाहीर प्रस्ताव निर्लज्जपणे देतात! त्या बदल्यात काँग्रेस परिवार पाकिस्तानला काय काय देणार आहे, यातलं एक कलम काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी नुकतेच उघड केले आहे.
“काँग्रेस परिवार दिल्लीत सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरची पूर्वस्थिती बहाल केली जाईल!” पाकिस्तान पुरस्कृत उरी-पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस परिवार जेवढा अस्वस्थ, व्यथित झाला नसेल, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक तो भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर, बालाकोट हवाई कारवाईनंतर अस्वस्थ, व्यथित झाला होता! गलवान घाटीत कर्नल संतोष बाबूसह २० भारतीय जवान चिनी सैनिकांकडून मारले गेल्याचा विकृतानंद काँग्रेस परिवार जसा लपवू शकला नाही, तसाच तो गलवानच्या २० बलवानांकडून अर्धशतकाहून अधिक लाल सैनिक यमसदनी धाडले गेल्याचे समजल्यावर पडलेले सूतकही लपवू शकला नाही. चीन, पाकिस्तान आणि काँग्रेस परिवार त्रिकुटाचं इतकं घट्ट मेतकूट असल्यामुळे त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाची खिल्ली उडवली जाणं, विरोधासाठी विरोध केला जाणं, अगदी स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. आपापले नानाविध हितसंबंध सांभाळण्यासाठी या त्रिकुटाला भारतात आणि भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत काँग्रेस परिवाराची सरकारं हवी आहेत. त्यासाठी हे विधिनिषेधशून्य त्रिकूट कुठल्याही थराला जाऊ शकते. गेली सात वर्षे काँग्रेस परिवार सातत्याने वेगवेगळी, तथ्यहीन, भ्रामक, नॉनइश्यू कारणं पुढे करून भारतभर अशांतता, अराजकता माजविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे आणि तिकडे चीन, पाकिस्तान भारताच्या पश्चिमोत्तर-उत्तर-पूर्वोत्तर सीमा अस्थीर करण्याचा पूरक डाव खेळत आहेत. हेच ते भारतविरोधी ‘थ्री फ्रंट वॉर’ आहे!
रोहित वेमुला, अखलाख-जुनेद मॉब लिंचिंग, कोरेगाव-भीमा, पुरस्कार वापसी, कठुआ, ‘सीएए’-शाहीनबाग, ‘जेएनयु’-जामिया मिलीया, कृषी सुधारणा कायदे-किसान आंदोलन! एक ना अनेक! केवढा गदारोळ उडवून दिला आहे या कुटील त्रिकुटाने? हजारो-करोडो रुपयांची राष्ट्रीय संपत्ती स्वाहा, आर्थिक विकास प्रक्रियेला जबरदस्त खीळ बसली ती वेगळीच? अशा प्रत्येक आंदोलनातला फोलपणा प्रत्येक वेळी चव्हाट्यावर येतोय. पण, लाज ना शरम! कसेही करून, मोदी सरकारला हटवून यांना काँग्रेस परिवाराला सत्तेवर बसवायचे आहे! अहो, पण सत्ता अशी देशद्रोही षड्यंत्रकारी ‘टूलकिट्स’ वापरून नाही मिळणार? चीन, पाकिस्तान, शस्त्रास्त्र लॉबी, ‘पेट्रोलॉबी’, ‘फार्मालॉबी’ वगैरेंची दलाली करून नाही मिळणार? नरेंद्र मोदींची, भारत सरकारची, राष्ट्रवाद-राष्ट्रभक्तांची टिंगलटवाळी करून, बदनामी करून नाही मिळणार? सत्तेवर येण्यासाठी राजकीय पक्षांनी जी कामं करायची असतात, ती कामं आंदोलनजीवी, परजीवी, चंदाजीवी, मीडियाजीवी भाडोत्री लोकांकडून ‘आऊटसोर्सिंग’ करून घेऊन कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही.
संसद भवनात प्रथमच प्रवेश करताना तिच्या पहिल्या पायरीवर शिरसाष्टांग नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी!’ या पठडीतले आहेत. नरेंद्र मोदींच्या काठीचा आवाज येत नाही आणि आपला पार्श्वभाग किती सुजलाय हे समजायलाही बराच वेळ जावा लागतो! २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन ‘स्वच्छ भारत’ अभियानाला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांची टिंगलटवाळी केली गेली, त्यांच्या ‘घर तिथे शौचालय’ योजनेची हेटाळणी केली गेली. त्यांच्या ‘उजाला-उज्ज्वला’ योजनेचीही टिंगल केली गेली. अगदी अलीकडे त्यांनी ‘स्वदेशी कोविड लस’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तेव्हाही त्यांच्यावर अविश्वास दाखवला गेला. नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानातील झाडूचा जोरदार फटका आंतरराष्ट्रीय फार्मा लॉबीच्या आणि भारतातील तिच्या दलालांच्या पार्श्वभागावर किती जबरदस्त वळ उठवून गेलाय, हे लक्षात यायला २०२१ साल उजाडावे लागले! “मोदीजी, हमारे लिए विदेशी व्हॅक्सिन मंगवाओ ना? मोदीजी, हमारे लिए ‘फायझर’ मंगवाओ ना?”
भारताच्या अखंड अथक परिश्रमातून निर्माण झालेली स्वस्त ‘कोविड’ लस भारत सरकारने जगभरातल्या अनेक गरजवंत देशांना पदरमोड करून पाठवली, तेव्हा याच भाडोत्री रुदालींनी भोकाड पसरले, “मोदीजी, हमारे बच्चों की ‘व्हॅक्सिन’ आप ने विदेश क्यों भेज दी?” जेव्हा त्याच विदेशातून मदतीचा ओघ न मागता भारतात बरसू लागला, तेव्हा रुदालींची दातखीळ बसली.
केनियासारख्या धनाने गरीब; पण मनाने श्रीमंत असलेल्या देशाने भारतासाठी सुदाम्याचे पोहे पाठविले! त्यापेक्षा धनाने श्रीमंत आणि मनाने दळभद्री असलेला काँग्रेस परिवार सत्तेवर यायची स्वप्नं बघतोय! पहिल्या पंचवर्षीय कारकिर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा झंझावाती विदेश दौरे करीत होते, तेव्हाही त्यांची टिंगल केली गेली, ‘नॉन-रेसिडंट इंडियन प्राईम मिनिस्टर!’ काँग्रेस परिवार ज्यांच्या मदतीने नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करायची स्वप्नं बघतोय, तो पाकिस्तान आज दिवाळखोर, भुकाकंगाल झालाय; चीनची आर्थिक घमंड उतरलीय; चीन-पाकिस्तान जगात एकाकी पडलेत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या झंझावाती विदेश दौर्यांमुळेच ना? ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी!’ ‘विमुद्रीकरण’, ‘जीएसटी’, ‘किसान सन्मान निधी’, ‘डीबीटी’ आणि अशा असंख्य लोककल्याणकारी निर्णयांमुळे अनेक नाठाळांच्या माथ्यांवर न जिरणारी असंख्य टेंगळं जरूर उठली असतील. पण, गेल्या सात वर्षांत राष्ट्रहिताशी कुठेही तडजोड स्वीकारली गेली नाही! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!’ संदेशाला तसाच सकारात्मक प्रतिसाद देत आपणही विकासयात्रेत सक्रिय सहभागी होऊया! हर हर महादेव!
- सोमनाथ देशमाने