नवी दिल्ली : पंचतारांकित आणि बड्या खासगी हॉटेल्समधील लसीकरण तातडीने थांबविण्याचे आदेश रविवार, दि. 30 मे रोजी केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारांना देण्यात आले.खासगी रुग्णालयातील ’हॉटेल पॅकेज’वर केंद्र सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्र जारी करत राज्यांना आदेश दिले आहेत.
देशातील काही खासगी रुग्णालये हॉटेल्ससोबत करार करून लसीकरणासाठी विशेष पॅकेज देत आहेत. यात हॉटेल्समधील आलिशान सुविधांसोबत लसीकरणाची ‘ऑफर’ही दिली जात आहेत. मात्र, काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार आढळून आल्यानंतर खासगी हॉटेल्समधील लसीकरण सुविधा तातडीने बंद करावी, असे आदेश केंद्र सरकारने राज्यांना पत्रातून दिले आहेत.
खासगी रुग्णालयांनी हॉटेल्ससोबत केलेले करार करून केलेली लसीकरण सुविधा म्हणजे देशाच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन आहे. तसेच हे नियमांविरोधात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हॉटेल्स पॅकेजसोबतची लसीकरण सुविधा तातडीने बंद करावी. ज्या खासगी रुग्णालयांनी अशा प्रकारे लसीकरणासाठी हॉटेल्ससोबत करार केला आहे त्यांनी तो लगेच रद्द करावा, असेदेखील आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
केंद्र सरकारने आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, “देशात लसीकरणासाठी फक्त चार पर्याय आहेत. पहिला म्हणजे सरकारी ‘कोविड’ लसीकरण केंद्र. तसेच दुसरा पर्याय म्हणजे खासगी रुग्णालयांद्वारे चालवण्यात येणारी खासगी लसीकरण मोहीम. तिसरा सरकारी कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली लसीकरण सुविधा आणि खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून चालवण्यात येत असलेली लसीकरणे केंद्रे. चौथे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घराजवळ उभारण्यात आलेले लसीकरण केंद्र, असे केंद्र सरकारने बजावले आहे. केंद्र सरकारने लसीकरणासाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी कुठेही लसीकरण करता येईल.
पण त्याशिवाय इतर कुठल्या ठिकाणी लसीकरणाला परवानगी नाही. यामुळे खासगी हॉटेल्समधील लसीकरणाची ऑफर ही लसीकरणच्या आदेशांविरोधात आहे. हे प्रकार लगेच थांबवावेत. आदेशांचे आणि नियमांचे उल्लंघन करणार्या संस्थांविरोधात कायदेशीर कारवाईसह प्रशासनाकडूनही कारवाई केली जावी. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होते की नाही? यावर देखरेख ठेवावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.