दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील दै. ‘मुंबई तरुण भारत’चा ‘कालजयी सावरकर विशेषांक २०२१’ प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे. यावर्षी २ मे रोजी सावरकर बंधूंच्या अंदमान कारागृहातील सुटकेला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून यावर्षी ‘अंदमान पर्व’ या विषयाची निवड करण्यात आली आहे.
२ मे, १९२१ ला सावरकर बंधू म्हणजे बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघा बंधूंची अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून मुक्तता झाली होती. पण, हे लक्षात ठेवायला हवे की, त्यांची अंदमानातून सुटका झालेली असली, तरी त्यांची जन्मठेपेतून आणि कारागृहातून सुटका केलेली नव्हती. त्यांना केवळ अंदमानच्या सेल्युलर कारागृहातून भारतातील मुख्य भूमीवरील कारागृहात स्थलांतरित केले होते आणि तिथेही त्यांचा अंदमान इतकाच छळ झाला होता आणि नंतर तीन वर्षांनी म्हणजे १९२४ साली सावरकरांची सशर्त सुटका होऊन त्यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते.
सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्य्यातील एक टप्पा किंवा पर्व म्हणून अंदमानचा काळ गणला जातो. तिथे सावरकरांना भोगावा लागलेला छळ, क्रूर बारीचे अत्याचार, त्या परिस्थितीतदेखील सावरकरांनी तिथे केलेले समाजकार्य, साहित्यनिर्मिती या आणि अशा अंदमान पर्वाशी निगडित पैलूंचे दर्शन घडवणारे लेख या विशेषांकात आहेत. तसेच अंदमान सेल्युलर कारागृहाचा इतिहास, अंदमानातील इतर राजबंदीवानांविषयी दुर्मीळ आणि अपरिचित माहिती आणि तीदेखील त्यांच्या वंशजांनी लिहिलेली माहिती; हेदेखील या विशेषांकाचे वैशिष्ट्य आहे.
दरवर्षी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या या ‘कालजयी सावरकर’ विशेषांकातून सावरकर, त्यांचे विविध पैलू आणि संबंधित समाजोपयोगी, राष्ट्रहितकारक माहिती वाचकांसमोर सादर केली जाते, तसेच नवे लेखक, अभ्यासक यांना सावरकर विचार-साहित्य वाचण्यास प्रोत्साहित करुन त्यांना आपले विचार लेखस्वरुपात मांडण्यास व्यासपीठ मिळवून दिले जाते. यावर्षीदेखील ती परंपरा कायम राखली आहे. यावर्षीही संपादक किरण शेलार यांनी माझ्यावर विश्वास दाखवून अतिथी संपादकत्वाचे दायित्व सोपवले, यासाठी खूप खूप आभार. वाचक यावर्षीच्या विशेषांकालादेखील दरवर्षीप्रमाणे भरभरुन प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद!
वंदे मातरम्!
अक्षय जोग
अतिथी संपादक