स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था

    27-May-2021
Total Views | 320

savarkar _2  H


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने काही सावरकरप्रेमी युवकांनी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था’ (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) या संघटनेची सन २०२०मध्ये स्थापना केली. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन धर्मातील प्रत्येक सण, परंपरा, संस्कृती यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, त्याचप्रमाणे समाजातील गरजू लोकांना मदत करणे, हा प्रमुख उद्देश आहे. हे संघटन सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आहे. त्याविषयी सविस्तर...


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. राष्ट्रहित, राष्ट्राबद्दलची दूरदृष्टी, धर्मात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषासंवर्धन, समानता अशी कित्येक निरनिराळ्या विचारांची अंगं ‘सावरकर’ या एकाच व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. त्यासाठी या अनेक विचारांचा एक मोठा साठा घेऊन या भारतभूमीत जन्म घेतलेल्या या महान देशाच्या सुपुत्राचे उच्चविचार जे राष्ट्रहित साध्य करून देणारे आहेत, यांचा प्रसार आणि प्रचार आज होणे ही काळाची गरज आहे आणि हा विचार प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, हे आता आमच्यासारख्या तरुण पिढीचे कर्तव्य आहे, या जबाबदारीची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा या संघटनेला सुरुवात झाली.
 
 
 
आता प्रत्येक घरात या थोर सावरकरांचे विचार पोहोचवायचे, या दृढ संकल्पनेमधून ‘घरोघरी सावरकर’ या उपक्रमाचा उदय झाला. आता ‘घरोघरी सावरकर’ या उपक्रमामधून सावरकरांचे विचार प्रत्येक घरात पोहोचविणे, म्हणजे शीतपर्वतारोहणापेक्षा कमी अवघडदेखील नव्हते. पण, तेव्हाच डोंबिवली येथील ‘सावरकर युवा प्रतिष्ठान ग्रुप’बरोबर ‘न समजलेले सावरकर’ या सावरकर दिनदर्शिकेची निर्मिती केली. २०२० साली प्रदर्शित झालेली ही दिनदर्शिका मी आणि माझे सावरकरप्रेमी मित्र आशुतोष पाठक यांनी खरं तर मनात थोडी भीती ठेवूनच अडीच हजार दिनदर्शिका छापून त्या अडीच हजार घरांत पोहोचवायच्या, असे ठरले आणि पहिल्याच प्रयत्नात ही दिनदर्शिका लोकांच्या खूप पसंतीस पडली. याचे कारण म्हणजे, अगदी कमी किमतीत उत्तम दर्जा आणि मुख्य म्हणजे सावरकरांच्या उच्च विचारांची अगदी सोप्या भाषेत आणि कमी शब्दांत केलेली सुंदर मांडणी.
 
 
यानंतर लगेच मार्च २०२०मध्ये सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर आणि सावरकरांचे अभ्यासक आणि लेखक अक्षय जोग यांचा ‘सावरकर’ या विषयावर पिंपरी, पुणे येथे भव्य जाहीर कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमातच संघटनेची जाहीर घोषणा केली गेली.
 
 
यानंतरदेखील असेच मोठमोठे ‘सावरकर’ या विषयावरील व्याख्यानाचे कार्यक्रम ठिकठिकाणी घ्यायचे, हे नियोजन सुरू असतानाच राष्ट्रावर मोठे संकट आले ते म्हणजे ‘कोरोना’चे. या महामारीमधील टाळेबंदी काही लवकर संपता संपत नव्हती. एवढ्या उत्साहात सुरू केलेल्या सावरकर विचारांचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य यामुळे महिनाभर पूर्ण थांबले. पण, जो विचार करणे थांबवतो तो सावरकरप्रेमी कुठला?
 
 


savarkar _1  H

आता जी वेळ होती ती सावरकरांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसाराची नाही, तर वेळ होती आता त्यांचे राष्ट्रसेवेचे विचार अमलात आणण्याची आणि तेव्हा सुरुवात झाली एका नवीन योजनेला. ‘स्वा. सावरकर सेवा निधी योजना.’ या योजनेमधून संघटनेकडून सलग दोन महिने गरजू लोकांना एक लाखांहून अधिक रुपयांचा किराणा घरोघरी वाटण्यात आला. यासाठी त्या गंभीर परिस्थितीतदेखील काही कार्यकर्ते ज्या घरात वृद्ध लोक आहेत, त्यांना घरी जाऊन किराणा देत होते. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
 
 
बघता बघता परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत होती. दरम्यान, सावरकरांचा फोटो असलेले भ्रमणध्वनी कवच (मोबाईल कव्हर) काहींना देण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर २०२० अखेरीस ज्याची प्रतीक्षा होती ती गोष्ट झाली, अखेर संघटनेला महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त संघटनेचा दर्जा मिळाला. लागलीच २०२१ या वर्षाच्या दिनदर्शिकाची तयारी सुरू झाली आणि विषय सुचला तो सावरकर यांच्यावर होणार्‍या आरोपांवर उत्तर देण्यासाठी त्यांचे असलेले वास्तव आधी लोकांसमोर मांडणे खूप गरजेचे होते. जे अक्षय जोग यांनी त्यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि वास्तव’ या पुस्तकातून या आधी मांडले होते. त्याचाच संदर्भ घेऊन खरे वास्तव लोकांपुढे अगदी कमी शब्दांत या दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडण्याची संकल्पना अक्षय जोग यांच्या पुढे मांडली. पण, याआधी या विषयावर माझा अभ्यास करणे खूप गरजेचे होते. त्यामुळे लगेच रोज सायंकाळी ऑफिसवरून आल्यावर दोन तास याचा जोमाने अभ्यास सुरू झाला आणि यानिमित्ताने मला सावरकर अजून जास्त समजण्यास मदत झाली.
 
 
ही दिनदर्शिका महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश या हिंदुस्थानातील राज्यांबरोबर अमेरिकेसारख्या देशासह या दिनदर्शिका एकूण सहा हजारांपेक्षा जास्त घरांत पोहोचविण्यात यशदेखील आले. विशेष म्हणजे, या दिनदर्शिका ‘सावरकर’ विषयाचे अभ्यासक आणि चित्रपटसृष्टीमधील थोर अभिनेते शरद पोंक्षे, चित्रपटक्षेत्रातील अभिनेते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिजीत पानसे, कीर्तनकार आफळेबुवा, राजकीय क्षेत्रातील नेते यांच्यापर्यंतदेखील पोहोचल्या आणि सर्वांच्या पसंतीस उतरल्या. याहून मोठे भाग्य ते काय!
 
 
पिंपरी-चिंचवड, पुणे पाठोपाठ सांगली, सोलापूर जिल्ह्यांतदेखील संघटनेचे कार्य सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यात असलेल्या बाबाराव सावरकर स्मारकाची स्वच्छता, तसेच शहरातील सावरकर पुतळा आणि परिसराचीदेखील स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता करण्यात आली. २०२१ साली स्वा. सावरकर आत्मार्पणदिन सप्ताहनिमित्त ‘होय, मी सावरकर बोलतोय’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, सावरकरांची सुंदर मूर्ती प्रत्येक घरात असावी, जेणेकरून सावरकरांबद्दल एक ओढ आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा त्या घरातील लहान मुलांमध्ये अगदी सुरुवातीपासून व्हावी आणि पुढील पिढीस सावरकर लवकर समजावेत, यासाठी २६ फेब्रुवारी ‘आत्मार्पण दिना’चे औचित्य साधून सावरकर मूर्ती घरोघरी पोहोचवायचा निर्धार घेऊन सुरू केलेल्या या कार्यात आतापर्यंत २००हून अधिक घरात ही मूर्ती पोहोचवली आहे.



‘घरोघरी सावरकर’ हा उपक्रम जोर पकडत असताना, त्या उपक्रमाचे अजून वेगळेपण जपून कमी कालावधीत अधिक लोकप्रिय ठरलेला ‘सावरकर ऑनलाईन वाचनकट्टा’ हा उपक्रम संघटनेचे सदस्य अजित कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सुरू झाला. हा वाचनकट्टा प्रत्येक सावरकरप्रेमीसाठी खुला असल्याने मोठ्या संख्येत सावरकरप्रेमी या ‘ऑनलाईन’ वाचनकट्ट्यामध्ये सहभागी होत आहेत.
 
 
तसेच, शेवडे गुरुजी, लेखक अक्षय जोग, सात्यकी सावरकर, लेखिका डॉ. शुभा साठे यांसारखे सावरकरविचारांचे अभ्यासक, लेखकदेखील या कट्ट्यामध्ये सहभागी झाले आहेत. या व्यतिरिक्त संघटनेकडून व्यावसायिकांना व्यवसाय उभे करून देणे, नोकरी शोधणार्‍या युवक-युवतींना चांगली नोकरी लावून देणे, औषधोपचार तसेच आर्थिक अडचण असणार्‍या पालकांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे, अशा प्रकारे अडचणीत असणार्‍या प्रत्येक सावरकरप्रेमींबरोबर ही संघटना नेहमीच सोबत असेल.
 
 
अतुल रेणावीकर, कृष्णा वैद्य, नीरज कुलकर्णी, योगेश पाटील, शीतल कापशीकर, पल्लवी गोडसे, सार्थक गोसावी यांसारखे पदाधिकारी आणि संघटनेमधील निःस्वार्थीपणे काम करणारे सर्व सदस्य यांच्यासह ही संघटना सावरकरांचे विचार आणि सावरकरांच्या समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध असेल.
 
 
जय हिंद, जय सावरकर!
- श्रीनिवास कुलकर्णी
(लेखक स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचार प्रणालीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

९५६१४९१६२५
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121