अंदमान-निकोबार! ही नावं ऐकताच पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल. अर्थात, निसर्गसौंदर्याने नटलेले हे बेट प्रेक्षणीय असले तरी प्रत्येक देशप्रेमींसाठी ते पर्यटनापलीकडे जाऊन एक ‘तीर्थक्षेत्र’ आहे.
पर्यटन म्हटलं की, स्टार हॉटेल्स, समुद्रकिनारा किंवा बर्फाचे डोंगर आणि भरपूर फोटोग्राफी, अशी काहीशी पर्यटनाची व्याख्या झाल्याचे दिसून येते. कामाचा तणाव बाजूला सारून मनसोक्त रिकामा वेळ घालवणं कधीतरी आवश्यक असलं, तरी त्याला ‘पर्यटन’ म्हणणे अगदीच चुकीचे ठरेल.
आपल्याकडे भारतात पर्यटन म्हणजे प्राचीनकाळी त्याला ‘तीर्थाटन’ असा शब्द होता. दळणवळणाची कोणतीही सुलभ साधन-व्यवस्था अस्तित्वात नसताना डोंगर-दर्या तुडवत संपूर्ण भारत पालथा घालणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात होता. काश्मीर ते कन्याकुमारी आणि अटक ते कटक चारधाम यात्रा केली जात असे. या तीर्थाटनामागे ‘ज्ञानप्राप्ती’ हा सरळ शुद्ध हेतू होता. इथे ज्ञान हे फक्त पुस्तकी ज्ञान अपेक्षित नसून, प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणांना दिलेल्या भेटीतून, त्यातून भेटलेल्या माणसांतून, निसर्गातून आणि जमा झालेल्या अनुभवातून ज्ञानाची गोळाबेरीज असे. काळ बदलला, प्रवास सुलभ होऊ लागले; इतके की, आम्ही तिथे जाऊन आलो हे सांगण्यासाठी ‘पर्यटन’ घडू लागले आणि पर्यटनाचा मूळ हेतू हरवला.
मनुष्य हा इतिहासात रमणारा प्राणी आहे. याचा उपयोग करून घ्यायचा म्हटलं, तर इतिहासातील ‘प्रेरणादायी सत्यांचा’ मागोवा घेत केलेले पर्यटन आपल्याला खूप काही देऊन जाते.असेच एक प्रेरणादायी सत्य भारताच्या दक्षिणेला समुद्र ओलांडला की, अनुभवायला मिळते. देशावर प्रेम करणारे, ‘जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’ मानणारे आणि मातृभूमीची परकीय बेड्यांतून सुटका व्हावी म्हणून सर्वतोपरी काम करणारे प्रेरणादायी सत्य!
अंदमान-निकोबार! ही नावं ऐकताच पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतात ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल. अर्थात, निसर्गसौंदर्याने नटलेले हे बेट प्रेक्षणीय असले तरी प्रत्येक देशप्रेमींसाठी ते पर्यटनापलीकडे जाऊन एक ‘तीर्थक्षेत्र’ आहे. तीर्थक्षेत्र - ज्या ठिकाणी आपल्याला जगण्याची प्रेरणा मिळते. जाण्याचे साधन आणि साध्य यांचा आविष्कार होतो. धर्म म्हणजे, आपण जे धारण करतो ते, इथे भारतीय असणे यासाठी वेगळेपणाने काही धारण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे भारतीय धर्म बाळगणार्या प्रत्येकासाठी ‘सेल्युलर जेल’ला दिलेली भेट ही तीर्थयात्रा आहे.
स्वा. सावरकर म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोत. त्यांचं जीवनचरित्र असो किंवा काव्य, आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची ताकद त्यात दडली आहे.
की घेतले न हे व्रत अंधतेने।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने।
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥
कोणत्याही महत्त्वाकांक्षेचा पाया कसा असावा, याचं उत्तम वर्णन म्हणजे सावरकरांच्या या ओळी. जे दिव्य ते दाहक असणार ही मनाची तयारी मोठ्यात मोठ्या अडचणी पार करून नेते. ‘बुद्धयाची’ म्हणजे जाणीवपूर्वक हाती घेतलेले कार्य.
५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा, शब्द ऐकूनच एखादा कोलमडून पडला असता.
कुणी म्हणेल हे सारे वाचायचे आणि ऐकायचे, तर तिथे जाण्याची आवश्यकता काय?
आपल्याकडे ‘स्थान महात्म्य’ असा शब्द आहे आणि त्याचे खरेच मोठे महत्त्व आहे. एखाद्या जागी जाऊन त्या विषयाबद्दल समजून घेतले म्हणजे तो विचार मनावर ठसवला जातो. आपण लिहिताना ती गोष्ट पाहतो, ऐकतो आणि लिहितो आणि त्याचा प्रभाव फक्त वाचनापेक्षा अधिक असतो. तसेच, नुसते वाचणे किंवा ऐकणे यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन त्या वातावरणात याची उजळणी करणे, हे पर्यटनातून काहीतरी ‘मिळवणे’ आहे. अशा प्रत्यक्ष भेटीमधून त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचे चरित्र आळवणे म्हणजे आपल्या मनावर त्याचा अमिट ठसा उमटवणे होय.
त्यांच्या कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटलं तर - कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबर्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ, कुशल संघटक, धाडसी आणि कणखर व्यक्तिमत्त्व सोबतीला देशप्रेमाची धगधगती ज्वाला हृदयात बाळगून ‘वन्ही तो चेतवावा’ न्यायाने केलेले समाजप्रबोधन अशी सावरकरांची अनेकविध रूपे आहेत.
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’, अशी बालवयात भगवतीसमोर शपथ घेणारा विनायक ते मार्सेलिस बंदरातील धाडस हा प्रवास त्यांची ध्येयाप्रति असणारी निष्ठा दर्शवते. या अनुषंगाने एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते, मुंबई महापालिकेचा पहिला गव्हर्नर सर आर्थर क्रॉफर्ड याने त्याच्या ‘लिजंड्स ऑफ द कोकण’ या पुस्तकात मार्सेलिसचा उल्लेख केला आहे. आपण ऐकताना ‘सावरकरांनी बोटीतून उडी मारली’ या एका वाक्यात कथा संपते. पण, ते तितकं सोपं नाही. आर्थरने आपल्या इथल्या वासोट्याच्या किल्ल्याचं वर्णन करताना वासोट्याची अभेद्यता पाहता त्याचा ‘कैदखाना’ म्हणून केलेला वापर त्याची तुलना फ्रान्सच्या शॅटोडीफ-मार्सेलिसशी केली आहे, ज्याला ‘कैद्यांची दफनभूमी’ असे संबोधले जाई. त्याच्या मते जगातले सगळ्यात कठीण असे हे दोन तुरुंग होते. कल्पना करा, जिथे एकदा आत गेलेल्या कैद्याची मृत्यूशिवाय सुटका नाही हे सर्वमान्य असताना तिथून सुटून जाण्याचा प्रयत्न करणे याला ‘अदम्य आत्मविश्वास’ नाहीतर काय म्हणावे?
१८५७चा उठाव हे बंड नसून, इंग्रजांविरुद्धचे पहिले ‘स्वातंत्र्यसमर’ आहे, हा विचार रुजवणारे सावरकर. ‘अभिनव भारत’ची स्थापना करणारे सावरकर. ‘सागरा प्राण तळमळला’, ‘जयोस्तुते श्री महन्मंगले’, ‘हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ यांसारखी काव्यरचना करणारे सावरकर. आपल्या धर्माचे, गाईचे वेगळ्या अर्थाने महत्त्व सांगणारे सावरकर. पतितपावन मंदिर आणि अशी ५०० मंदिरे सर्वांसाठी खुली करून ‘सहभोजन’ घालणारे, जात्युच्छेदन करणारे सावरकर. भाषेचा अभ्यास आणि अभिमान बाळगून त्यांनी माय मराठीला अनेक शुद्ध शब्दांची देणगी दिली आहे. ‘माझ्या मृत्यूनंतर या शरीराचा विद्युत दाह करा’ असे सांगणारे विज्ञानवादी सावरकर. ‘नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा’ अशी मातृभूची थोरवी दर्शवणारे सावरकर...
आढावा घ्यायचा म्हटलं तरी शब्द कमी पडतात आणि हे महान कार्य करणारा माणूस आयुष्यातला मोठा काळ ‘काळ्या पाण्याच्या’ शिक्षेवर तुरुंगात होता. तुरुंग... कोणतेही बंधन माणसाच्या जगण्याला, फुलण्याला, आनंदाला आणि महत्त्वाकांक्षांना संपवून टाकते, मारून टाकते आणि आपण पाहत आहोत की, अशाच काळ्या पाण्याच्या शिक्षेवर असणार्या, ज्यांच्या सुटकेचा मृत्यू वगळता कोणताही मार्ग शिल्लक नाही, अशा परिस्थितीत सावरकरांनी केवढे कार्य केले. मातृभूमीचे स्वातंत्र्य हे एकच ध्येय उराशी बाळगून ते जगले.
मी, स्वतः टुरिझम क्षेत्रात कार्यरत आहे आणि ‘रमा एज्युकल्चरल टुरिजम’ या माझ्या कंपनी अंतर्गत विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मी काम करते. ‘पर्यटनातून व्यक्तिमत्त्व विकास’ यावर माझा ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक ठिकांणापैकी ‘अंदमान-निकोबार’ हे आवडतं ठिकाण आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे ठिकाण ‘त्या काळी’ मात्र दमट आणि रोगट होते. इथला समुद्रकिनारा आणि हिरवाई डोळ्यांना तृप्त करते आणि ‘सेल्युलर जेल’ जिथे आजही जाताना एक भीतीचे सावट जाणवते, ते त्या काळी कसे असेल याची कल्पना करता येते. आज तिथे सावरकरांचे काही काव्य ताम्रपट्टिकेत कोरून लावले आहे.
एकूणच त्यांचे कार्यकर्तृत्व जाणून घेताना त्यांच्या आयुष्यातला हा ‘काळा’ भाग जाणून घेणे आवश्यक ठरते. त्यातून त्यांच्या कार्याची झळाळी मनाला भिडते. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आयुष्याला उपयोगी असे ज्ञान शिकून येतो, त्या सगळ्या जागा म्हणजे ‘तीर्थ’!
नावीन्याची ओढ असणार्यांसाठी फिरस्ती हा भला मार्ग आहे. शिवाय, तुम्हीही स्वतःला नव्याने सापडता आणि हे सगळं आणखी विशेष ठरतं, जेव्हा तुम्ही आपली ‘हेरिटेज भूमी’ अनुभवायला, समजून घ्यायला निघालेले असता. इथे आपण देशभक्ती तर शिकतोच. परंतु, इथे जाऊन आल्यावर जगण्याचा दृष्टिकोन आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतो. या निमित्ताने आपल्याला आवश्यक असणारे, परंतु, आपल्याला अनभिज्ञ असणारे पैलू उलगडत जातात.
आज आपण ‘कोविड’च्या संकटात असल्यामुळे ‘पर्यटनक्षेत्र’ ठप्प आहे. महामारीच्या संकटाने मनावर भीतीचे, निराशेचे ढग जमा होत आहेत. हीच वेळ आहे ‘सावरकरांना’ आठवण्याची! त्यांच्या चरित्रातून, काळ-कर्तृत्वातून प्रेरणा घेण्याची. जगण्याचा हेतू आणि जगण्याची जिद्द बळकट करण्याची.
सावरकरांची ही पुढील ओळ माझ्यासाठी, माझ्या जगण्याचा आणि कामाचा प्रेरणास्रोत आहे-
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा। हा व्यर्थ भार विद्येचा॥
आपण जे शिकलो त्याचा सुयोग्य वापर झाला नाही तर ते ‘भुईला भार’ ठरते.
आज या संकटकाळात आपण त्यांच्याकडून जगण्याच्या जिद्दीची प्रेरणा घेऊ, ही जगण्याची जिद्द आपल्या जगण्याचा हेतू सबळ करेल आणि लवकरच, यातून बाहेर येऊन आपण आपल्या प्रेरणास्थानाला भेट देण्यासाठी ‘तीर्थक्षेत्री’ जाऊ. सावरकरांच्या स्मारकाला भेट देऊ आणि उमेदभरल्या मनाने आयुष्याची वाटचाल करू.
दिप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ - ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना जपणारा सुजाण नागरिक घडवण्याची प्रेरणा देणारे तीर्थक्षेत्र - सेल्युलर जेल - स्वा. सावरकर स्मारक, अंदमान-निकोबार!
- नीलिमा देशपांडे
९९२२९२७१४३