फांदी तुटली ! त्यांची आयुष्य उध्वस्त झाली...

    13-Apr-2021
Total Views | 81

kolhapur_1  H x



स्वतःला पुरोगामी म्हणवून घेत धन्यता मानणाऱ्या सामाजिक संस्थांचा ज्या कोल्हापूर जिल्ह्यात पगडा आहे. त्याच जिल्ह्यातच चालीरीतींच्या नावाखाली विकृती माजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


कोल्हापूरमधील कंजारभाट समाजातील दोन तरुणींचा विवाह बेळगावमधील दोन सख्ख्या भावांशी झाला होता. २७ नोव्हेंबर २०२० रोजी हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर समाजाच्या प्रथेनुसार लग्नानंतर या मुलींना कौमार्य चाचणी द्यावी लागली. त्यादरम्यान एक बहिण कौमार्य चाचणीत नापास झाल्याचं सासरच्या मंडळींनी म्हटलंय. यावरुन आम्हा दोन्ही बहिणींच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत घरच्या सदस्यांकडून मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आलंय, असं या मुलींनी तक्रारीत सांगितलं. लग्न झाल्यानंतर अवघ्या ३ ऱ्या दिवशी या दोन बहिणींना खोटं सांगत कोल्हापूरमध्ये माहेरी सोडण्यात आले. चारित्र्य सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या या मुलींकडे सासरच्या लोकांनी १० लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.


या मुलींच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून इतकी रक्कम जमा करणं अशक्य असल्याने या मुलींना खोटं सांगून माहेरी पाठवण्यात आल्याचं या मुलींच म्हणणं आहे. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे या चाचणीत दोन्ही तरुणी नापास ठरल्याचा दावा करुन झाडाची फांदी मोडून, जात-पंचायत भरवून जात पंचायतीने हा विवाह मोडीत काढलाय. आम्ही तुम्हाला नांदवणार नाही असं जात पंचायतीमार्फत सासरच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे कौमार्य चाचणी करणाऱ्या कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. हा सगळा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणींना आणि त्यांच्या आईला विश्वासात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाणे गाठलं. अखेर दोन्ही नवरदेवांविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० एप्रिलला आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर मुलींचे मानसिक आणि शारिरिक शोषण केल्याच्या आरोपाखाली ४९८ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.


खरंतर कोल्हापुर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर. धार्मिक केंद्रातुन कोल्हापुरास दक्षिण काशी असं मानाचं स्थान प्राप्त आहे. ऐतिहासिकदृष्टयाही हे शहर महत्वाचे असून प्राचीन काळापासून ते विविध राजघराण्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणामुळे कोल्हापुरने नवा आदर्श निर्माण केला. याच कोल्हापूरला राजधानीचे शहर बनविणाऱ्या त्या राणी ताराबाईंचा हे शहर, विद्येचं माहेरघर असणाऱ्या या शहरात घडलेली ही घटना नक्कीच माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ही घटना केवळ जातीयतेने बुरसटलेल्या मानसिकतेचा एक अंश आहे. महिलांवर अन्याय करणाऱ्या तसेच त्यांना दुय्यम स्थान देणाऱ्या अशा अमानुष जातीप्रथांना बंद करण्याची आज गरज आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. याविरोधात कडक कायदेही अस्तित्वात आले मात्र आज कंजारभाट समाजातल्या लोकांच्या मनावरची जळमट दूर झाली पाहिजे कारण फक्त कायदा असून उपयोग नाही तर मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी समाजातील सुशिक्षित तरुण तरुणींनी आज समोर येऊन याविरोधात आवाज उठवला पाहिजे, अशा जात पंचायतींवरदेखील सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून समाजात अशारितीने अन्याय झालेल्या महिला समोर येतील व आरोपीनाही कायद्याचा धाक वाटेल.

अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121