'मुंबई तरुण भारत'ने फाडला होता
मालवणी पॅटर्नचा बुरखा : वाचा संपूर्ण प्रकरण
मुंबई : अवैध मशिदीविरोधात तक्रार करणाऱ्याला दमदाटी, घर सोडून जाण्यासाठी हिंदूंवर दबाव, हिंदूंच्या मालमत्ता स्वस्तात लाटणे, अशा झुंडशाही विरोधात सातत्याने दैनिक 'मुंबई तरुण भारत' व 'महाMTB'तर्फे उठवलेल्या प्रकरणांना भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात वाचा फोडली. हिंदूंविरोधात सातत्याने चालवल्या जाणाऱ्या 'मालवणी पॅटर्न'विरोधात डरकाळी फोडत सभागृह दणाणून सोडले. हिंदू मतदार पद्धतशीरपणे कमी करून रोहिंग्या, बांग्लादेशींना मतदार यादीत घुसवून मतदार संघ तयार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
लोढा म्हणाले, "जम्मू काश्मीरमध्ये कशाप्रकारे हिंदू काश्मिरी पंडितांवर अन्याय होत होता आणि त्यांना जम्मू काश्मीर सोडून जाण्यास भाग पडले गेले. तसाच काहीसा प्रकार मुंबईतील मालवणीत घडत आहे. गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कलम ३७० रद्द करत हिंदूंना न्याया मिळवून देण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील हिंदू विरोधी वातावरण व राममंदिर निधी संकलनादरम्यान मालवणीत प्रभू श्रीरामांचे पोस्टर काढून हटवण्यात आले."
"काही वर्षांपूर्वी आसाममध्ये काही भागांत हिंदू बांधवांना पळवून लावण्यात आले होते. त्या ठिकाणी म्यानमार व बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना स्थान देण्यात आले. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये आणि काश्मीरमध्ये देखील काही भागांमध्ये घडली. अशाचप्रकारची धक्कादायक घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुंबई शहरात मालवणी ठिकाणी घडली आहे.", असेही ते म्हणाले.
मालवणीत पोलीसांनी फाडले पोस्टर
देशभर राममंदिराच्या निधी संकलनासाठी अभियान राबवले जात आहे. मात्र मालवणीत श्रीरामांचे छायाचित्र असणारे निधी संकलन अभियानाचे पोस्टर पोलिसांनी फाडले. या संदर्भात तक्रार करण्यासाठी गेलेल्या हिंदू बांधवाची तक्रार घेण्यात आली नाही. उलट त्यांना सहा तास पोलिस ठाण्यात बसवण्यात आल्याची माहिती आमदार लोढा यांनी सभागृहात दिली.
छेडा नगरातील धक्कादायक प्रकार
लोढा यांनी मालवणी छेडा नगर भागात घडलेल्या प्रकारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "छेडा नगरमध्ये पाच वर्षांपूर्वी १६० परिवार वास्तव्यास होते, आजही तेथे १६० परिवाराचं वास्तव्यास आहेत. मात्र, आज फरक हा आहे कि आज त्यापैकी केवळ ६० हिंदू आहेत. बाकी शंभर कुटूंबांना त्यांचे घर सोडून जावे लागले होते. याचे कारणही तितकेच भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले.
घर सोडून जाण्यासाठी भाग पाडले जाते!
हिंदू परिवार सोडून जाण्याचं कारण असे की, "या नागरिकांच्या मोकळ्या असणाऱ्या जागेत जबरदस्तीने बेकायदा मशिदी उभारण्यात आल्या. तसेच मशिदींच्या अवैध भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही," असा आरोप त्यांनी केला. मालवणी पोलीस ठाण्यात किती तक्रारी येऊन पडल्या आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे याची माहिती आज देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
चाळीत वास्तव्याला असणाऱ्या ५८ कुटूंबांवरही तीच वेळ
मालवणीतील चाळीत वास्तव्यास असणाऱ्या ५८ दलित परिवारांवरदेखील अशाच प्रकारे परिसर सोडून जाण्याची वेळ आल्याचे लोढा यांनी सांगितले. "मालवणी भागातच एका चाळीत ५८ दलित परिवार वास्तव्यास होते. त्यापैकी फक्त ६ परिवार आज त्याभागात आहेत कारण त्यांनी हिंमत दाखवली आणि आपली जागा न सोडण्याचे ठरविले. एवढेच नाही तर हे सर्व मालवणी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये आहे.", असेही ते म्हणाले.
"मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी अहवाल मागवून घ्यावा"
"महाराष्ट्रात अशाच पद्धतीने हिंदूंवर अन्याय होत राहिला तर महाराष्ट्रात हिंदू अल्पसंख्यांक होतील आणि याची सुरुवात या मालवणी पॅटर्नने होत असल्याचा घणाघाती आरोप लोढा यांनी सभागृहात केला. या मालवणी पॅटर्नला रोखलं पाहिजे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी मालवणीत घटनांचा अहवाल मागवून घ्यावा आणि या सर्व प्रकरणांची दाखल घ्यावी", अशी मागणी लोंढा यांनी केली.
महाराष्ट्रात भीतीचे वातावरण
महाराष्ट्रातील हिंदुविरोधी घटनांवरून व हिंदूंमध्ये भीतीचे वातवरण निर्माण होण्याचे कारण सांगत राज्य सरकारवर टीका करताना लोढा म्हणाले, "राज्यात पालघरमध्ये साधुंचे हत्याकांड झाले. राज्यातले मंत्री साधूंना नालायक म्हणतात. याविरोधात मी स्वतः मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महाराष्ट्रात साधूंबाबत अपशब्द काढले जातात आहे का ? इथे कुणात हिंमत आहे का मौलवींविरोधात अपशब्द काढायची ? , चर्चच्या फादरविरोधात अपशब्द काढायची. राज्यात केवळ हिंदूंना टार्गेट केले जात आहे. याला राज्य सरकारच्या अभय आहे." अशी गर्जना लोढा यांनी विधानभवनात केली.
अस्लम शेख यांनी फेटाळले आरोप
हिंदू मतदार घटत असल्याचा आरोप आमदार अस्लम शेख यांनी फेटाळला. लोढा यांचे म्हणणे चूकत असल्याचे ते म्हणाले. ३ लाख मतदार संघ असलेल्या मालाड मालवणीत २ लाख ३० हजार ही हिंदू मते आहेत, असा दावा शेख यांनी केला. पोलीसांनी राम मंदिराचे पोस्टर फाडल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.