ठाणे: राष्ट्रभक्ती व संस्कृतीचा प्रसार व संवर्धनासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील स्वयंसेवकांनी सण-उत्सवाच्या माध्यमातूनही सामाजिक बांधिलकी जपण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे होळी पौर्णिमेला म्हणजे रविवार, दि. २८ मार्च रोजी ‘रोटी डे’ आयोजित करण्यात आला आहे. होळीच्या निमित्ताने घराघरांतून उपलब्ध झालेल्या पुरणपोळ्या गोरगरीब तसेच उपाशीपोटी झोपणार्यांना वाटण्यात येणार असल्याची माहिती स्वयंसेवक रोहन शिंदे यांनी दिली.
यंदा कोरोनामुळे होळी उत्सव साजरा करण्यावर प्रशासनाची बंधने आली आहेत. तरीही, परंपरेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करताना घरोघरी पुरणपोळीचा बेत आखला जातोच. काहीजण श्रद्धेपोटी म्हणा अथवा पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून होळीमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. अशाप्रकारे अन्न वाया जाण्यापेक्षा या पुरणपोळ्या गोळा करून ‘रोटी डे’ या संकल्पनेनुसार रस्ता, स्टेशन, बस स्टॅण्डवर उपाशीपोटी, अर्धवट उपाशी झोपणार्या गोरगरिबांना पुरणपोळी वाटली जाते. या पुरणपोळ्या घराघरांतून गोळा केल्या जातात. घरटी किमान एक पुरणपोळी देण्यात यावी एवढीच अपेक्षा असते. पुरणपोळी शक्यतो कागदी पिशवीत किंवा स्वच्छ कागदात गुंडाळून द्यावी. त्याचप्रमाणे वामनराव ओक रक्तपेढीच्या मागे असलेल्या प्रताप व्यायामशाळेतही रविवार, दि. २८ मार्च रोजी रात्री ८ ते १० या वेळेत या पुरणपोळ्या गोळा केल्या जाणार आहेत.
इच्छुकांनी आपल्याकडील पुरणपोळ्या या ठिकाणी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी रेवती शिंदे ९३२१३६१५७९ नील तलगरी ९८९२३०६४८४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष असून याकामी रोहन बावडेकर, सर्वेश शेंडे, पूनम धुमाळ, संकेत दिवाण आदींसह १० ते १२ जण सहभागी होणार आहेत.