कौटुंबिक बंध जपणारा उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Mar-2021   
Total Views |

kulkarkarni_1  



उद्योग-व्यवसाय क्षेत्र हे संपूर्णत: यांत्रिकीकरणावर आधारित असते. त्यामुळे येथे मानवी भावनांना तसे फारसे महत्त्व दिले जात नाही, अशी एक मनोधारणा समाजातील काही लोकांची असते. मात्र, नाशिक येथील सातपूर औद्योगिक वसाहतीत असणारी ‘निर्मिती प्रेसिजन प्रा. लि.’ ही कंपनी या विचारसरणीस छेद देणारी ठरते. याचे सर्व श्रेय जाते ते या कंपनीचे संस्थापक विवेक सदाशिव कुलकर्णी यांना. कोरोना महामारीच्या काळातही संकटांचा सामना करत कुलकर्णी यांनी ‘निर्मिती’वर सर्वस्वी भर दिला. त्यांच्या ‘कोविड’ काळातील नवनिर्मितीची ही उद्योगगाथा...


इतर औद्योगिक संस्थांप्रमाणेच ‘निर्मिती’समोरदेखील कोरोना काळात अनेकविध आव्हाने उभी ठाकली होती. मात्र, ‘निर्मिती प्रेसिजन’ ही केवळ एक कंपनी नसून तो एक परिवार आहे, याच धारणेतून कुलकर्णी यांनी कोरोना काळात झोकून कार्य केले आणि पित्यासम आपल्या कर्मचारीवर्गाचीही सर्वोपरी काळजी घेतली. कोरोना काळात आपल्या कंपनीतील कोणत्याही कर्मचार्‍याला कोरोनाची लागण होणार नाही आणि महसुलाशिवाय कंपनी किती काळ सुरू ठेवता येईल, तसेच, कंपनी पुन्हा सुरू झाल्यावर येणार्‍या आर्थिक अडचणींची समस्या, नव्याने प्राप्त होणार्‍या मालासंबंधीच्या ‘ऑर्डर’ समस्या अशा प्रकारची आर्थिक, मनुष्यबळाशी निगडित आव्हाने कुलकर्णी यांच्यासमोर उभी ठाकली होती. कंपनीतील कोणत्याही कर्मचार्‍यास कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी एका व्यवस्थेच्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. त्यातच ‘निर्मिती’ परिवाराच्या नाशिक, पुणे, अहमदाबाद व चेन्नई येथील सर्व प्रकल्पांतील मिळून १७ कामगारांना कोरोनाची लागण झाली. त्या सर्व कर्मचार्‍यांच्या उपचारांचा खर्च कुलकर्णी यांनी उचलला. तसेच, नंतरच्या काळात कुलकर्णी यांनी आपल्या कर्मचार्‍यांना ‘कोविड सुरक्षा कवच’मार्फत विमा संरक्षण प्रदान केले. वडिलांचे हे कार्य चालू असतानाच, कुलकर्णी यांच्या आदित्य व सुमेध या दोन्ही मुलांनी कोविड रुग्ण सर्व्हेक्षणात,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेक्षणात आपला सक्रिय सहभाग नोंदविला. कुलकर्णी यांनी सामाजिक भावनेतून शिधावाटपासाठी जिन्नस व अर्थसाहाय्य करत आपले सामाजिक दायित्वदेखील या काळात निभावले.कोरोना काळात भेडसावणारी रक्तपुरवठ्याची समस्या दूर व्हावी, यासाठी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कुलकर्णी यांनी ‘निर्मिती’ युनिटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करत सुमारे २५७ रक्ताच्या बाटल्यांचे संकलनही केले.

अडथळे, संकटे ही येतच असतात. मात्र, विश्वास आणि एकता ही दोन सूत्रे माणसाला कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्यासाठी कायमच मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे तरुणांनी संकटांचा विचार न करता विश्वास निर्माण करणे व तो जोपासणे यावर अधिक भर द्यावा.

कामगार हा आपल्या कंपनीचा कणा आहे, या भावनेतून कुलकर्णी यांनी कंपनीतील कनिष्ठ ते वरिष्ठ कर्मचारी अशा सर्वांनाच कोविड काळात कंपनी बंद असतानादेखील उत्तम जीवनमान व्यतित करता येईल, असे वेतनाचे स्वरूप ठेवले. त्यामुळे ‘निर्मिती’ परिवारातील कर्मचार्‍यांना कोरोना काळात आर्थिक चणचण जाणवली नाही. यासाठी कुलकर्णी यांना श्यामराव विठ्ठल बँकेचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, आर्थिक आवकेवर मर्यादा आलेल्या असताना आणि व्ययपेक्षा खर्च जास्त असतानादेखील कुलकर्णी यांनी शासनाचे सर्व कर वेळेत अदा केले. तसेच, त्यांनी कर्जाचे हप्तेदेखील वेळेत फेडले. स्वत: कुलकर्णी यांना या काळात कोरोनाची लागण झाली होती. अशा वेळी त्यांच्याच कंपनीतील तृतीय श्रेणीतील एक कर्मचारी हा कोरोनाबाधित आढळला होता. त्या कर्मचार्‍यास उपचारासाठी काही लाख रुपयांच्या खर्चाची आवश्यकता होती. त्यावेळी कुलकर्णी यांनी ते स्वत: कोरोनामुळे अत्यवस्थ स्थितीत असतानाही त्या कर्मचार्‍याचा सर्व वैद्यकीय खर्च उचलला. त्या कर्मचार्‍यास व त्याच्या कुटुंबीयांच्या स्मरणात हा प्रसंग कायमस्वरूपी लक्षात राहिला. त्यांनी कुलकर्णी यांचे धन्यवाद मानले. आपण माणुसकीच्या भावनेतून आणि ‘निर्मिती’ परिवाराच्या बांधिलकीतून ही मदत केल्याचे कुलकर्णी नम्रपणे सांगतात.



kulkarni _1  H
आधी नमूद केल्याप्रमाणे, कुलकर्णी हे स्वत: आजारी, त्यांच्या घरात त्यांची वय वर्षे ८५ असलेल्या मातोश्री, दोन मुलांपैकी एक मुलगा ‘वंदे भारत’ योजनेअंतर्गत नुकताच इंग्लंडहून नाशिकला आलेला. अशी त्यांची कौटुंबिक स्थिती होती. या काळात कुटुंबाचा संपूर्ण डोलारा त्यांची पत्नी स्वाती कुलकर्णी यांनी सांभाळला. तसेच, आपले ‘क्वारंटाईन’ संपताच इंग्लंडहून परतलेल्या मुलाने कंपनीचे कामकाज सांभाळण्यास लागलीच सुरुवात केली. त्यामुळे कुलकर्णी यांचा भार कमी होण्यास मदत झाली, तर लहान मुलगा सुमेध याने कुलकर्णी यांचे सर्व आजारपण या काळात सांभाळले. कुटुंबाचा भक्कम आणि प्रेमाचा आधार त्यांना या काळात मिळाला. त्यामुळे कुलकर्णी यांना कोरोनावर मात करणे सहज शक्य झाले.एप्रिल २०२० मध्ये पुणे येथे ‘निर्मिती प्रेसिजन’चे एक युनिट कार्यरत होणार होते. मात्र, ‘लॉकडाऊन’मुळे ते सुरू करणे शक्य झाले नाही. जानेवारी २०२१ मध्ये ते कार्यरत झाले. कोरोनामुळे मोठा आर्थिक फटका कुलकर्णी यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे आगामी काळात सुयोग्य आर्थिक नियोजन करून स्वतःला व ‘निर्मिती’ परिवाराला ‘फीट’ करणे हेच कुलकर्णी यांचे ध्येय आहे. उद्योजक हा नफा-तोटा यांच्या गणितात कायमच व्यस्त असतो. काही कंपन्यांचे मालक असेही असतात की, त्यांना आपल्या कारखान्यातील कर्मचारीवर्ग नेमका कोण, हेही माहीत नसते. अडचणीच्या काळात स्वतःला सावरणे हे कुलकर्णी यांना सहज शक्य होते. मात्र, त्यांनी ‘निर्मिती’ परिवारातील प्रत्येक व्यक्तीची जातीने काळजी घेतली. तसेच, आपल्या कर्मचार्‍यांना ते एकटे नसून आपण सर्व सोबत आहोत, असा आधार कायम दिला. अडचणीच्या काळात समूहाला आधार देणे, समूहाच्या सोबत राहणे हे खरे नेतृत्व कुलकर्णी यांनी केले. या सर्व कार्यात त्यांच्या पत्नी स्वाती यांनी त्यांना अनेकार्थाने खंबीर साथ दिली. सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहत ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हाच भाव कुलकर्णी यांच्या मनात प्रज्वलित करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळेच अशक्य ही शक्य झाल्याचे कुलकर्णी आवर्जून नमूद करतात. कौटुंबिक बंध जोपासत कुलकर्णी यांनी जोपासलेलाजिव्हाळा आणि पार पाडलेले कर्तव्य हे नक्कीच शब्दातीत आहे.

@@AUTHORINFO_V1@@