बॉम्बे कॅथोलिक सभेचा अराजकाला पाठिंबा ?
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशविरोधी ‘टूलकीट’प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली दिशा रवी आणि त्याच प्रकरणातील संशयित निकीता जेकब आणि शंतनू मुळूक यांच्याविरोधात सुरू असलेली कारवाई ही चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. यामध्ये कायद्याचे पालन करण्यात आलेले नाही, असा दावा 'बॉम्बे कॅथोलिक सभा' या ख्रिस्ती धार्मिक संस्थेने केला आहे. त्यामुळे ‘बॉम्बे कॅथोलिक सभे’चा अराजकाला पाठिंबा आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली २६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीत अराजकाची स्थिती निर्माण करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रीय प्रतिकांचा अवमानदेखील झाला होता. सदर घटना ही एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होती, हे ग्रेटा थनबर्ग नामक परदेशी व्यक्तीने ट्विट केलेल्या ‘टूलकीट’वरून समोर आले होते. हे टूलकीट’ तयार करण्यात आणि त्यात बदल करण्यामध्ये दिशा रवी, निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे पुढे आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दिशा रवी हिला अटक केली आहे. सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
त्याविषयी ‘बॉम्बे कॅथोलिक सभे’चे प्रवक्ते डॉल्फी डिसुझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिशा रवीचे कृत्य हे चुकीचे नसल्याचा दावा केला. पोलिसांनी कायद्याचे पालन केले नसून पर्यावरणवादी तरुण कार्यकर्त्यांना विनाकारण अडकविण्यात आले आहे. अशाप्रकारे प्रत्येक वेळी अटक करणे आणि तुरुंगात डांबणे योग्य नाही. त्याचप्रमाणे त्यांच्याविरोधात खलिस्तानी संघटनांशी संबंध असल्याचा आरोपही तथ्यहिन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, यामुळे ‘बॉम्बे कॅथोलिक सभे’च्या नेमकी भूमिका आणि याप्रकरणी त्यांना असलेला विशेष रस यामुळे त्यांचा अराजकाला पाठिंबा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.