मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आणि डीजी होमगार्ड परमवीर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविभागाच्या प्रस्तावावर सही केल्यानंतर, याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
परमवीर सिंह यांच्याविरोधात मुंबई, ठाण्यात खंडणी वसूल करण्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. मुख्यसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी देबाशिश चक्रवर्ती यांनी नियोजन विभागाचे सचिव असताना परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात यावे याबाबतचा रिपोर्ट सरकारला पाठवला होता. तसेच परमबीर सिंह यांच्यावर असलेले आरोप पहाता त्यांचे निलंबन करावे असा प्रस्ताव पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही गृहविभागाला पाठवला होता. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली केल्यानंतर आजच आदेश निघण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानुसार परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
अॅंटिलिया प्रकरणी उचलबांगडी झाल्यानंतर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. त्यानंतर परमवीर सिंह अनेक दिवस फरार होते. तब्बल सहा महिने गायब असलेले परमबीर सिंह सुप्रीम कोर्टाकडून अटकेस संरक्षण मिळाल्यानंतर मुंबईत आले. त्यांनी परतण्याची राज्य सरकारला माहिती दिली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले होते. तसेच पदभार न स्वीकारताच परमबीर सिंह सरकारी गाडीचा वापर करत असल्यामुळे गृहमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सिंह यांच्यावर राज्य सरकार कारवाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.