मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले होते. समीर वनखेडे यांच्या धर्मावरुनही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत वानखेडेंचे जातप्रमाणपत्र प्रसारित केले होते.
समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मलिकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान, समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे.
वानखेडे यांचे वकील अर्शद शेख यांनी ही माहिती दिली. “मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर फसवणुकीचा आरोप करत त्यांच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते हिंदू नसून मुस्लीम असल्याचंही मलिक यांनी म्हटले आहे. वानखेडे कुटुंबातील प्रत्येक जण खोटारडा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांची मुलगी यास्मिन वकील असून ती प्रॅक्टीस करत आहे, त्या फौजदारी वकील आहेत. अंमली पदार्थांच्या प्रकरणांशी संबंध नसतानाही त्यांच्याविरोधात मलिकांनी आरोप केले. मलिक यांनी वानखेडे कुटुंबातील सदस्यांचे नाव, चारित्र्य आणि त्यांच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणारे आरोप केले आहेत,” असं दाखल करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे. वानखेडे कुटुंबांतील कोणत्याही सदस्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये काही प्रकाशित करण्यात येऊ नये, त्यांच्याबद्दल लिहिण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली आहे.