अंतरीचा उजळवूया दीप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2021   
Total Views |

vividha.jpg_1  




यावर्षीचा ‘केशवसृष्टी पुरस्कार’ अपंग विकास बहुउद्देशीय संस्था संचलित ‘स्वयंदीप निवासी केंद्रा’च्या प्रमुख मीनाक्षी निकम यांना जाहीर झाला आहे. दि. १३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील विलेपार्ले येथील राजपुरिया सभागृहात सांयकाळी ६ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मीनाक्षी निकम यांच्या कर्तृत्वशील आणि प्रेरणादायी आयुष्याचा घेतलेला मागोवा.


तुला चालता येत नाही’ असे म्हणत मैत्रिणीने तिला हिणवले. तेव्हा ती इयत्ता चौथीत होती. आपण अपंग आहोत, दोन्ही पायाला पोलिओ झाला. आपल्याला मैत्रिणींनी चिडवले. यामुळे ती भयंकर व्यथित झाली. शेतात झाडाखाली बसली. त्या चिमुकलीच्या मनात प्रचंड वेदना आणि भविष्यातला अंधार उभा राहिला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतक्यात शेतातून एक भला थोरला नाग सळसळत बाहेर आला. कुणीतरी उठवल्याशिवाय ती पटकन उठू शकतच नव्हती. तो नाग सळसळत तिच्या दोन्ही पायांवरून पुढे निघून गेला. तो एक क्षण. भीती, आश्चर्य आणि असंख्य भावना तिच्या मनात दाटल्या. पण, या सगळ्या भावनांना मागे सारत एक विचार तिच्या मनात तेजाळला. तो म्हणजे, हा नाग याला ना पाय ना हात. सरपटतो, पण तरीही याची दहशत आहे. आपल्या गावात, घरात याला पुजतात. आपल्यालाही पाय नाहीत. पण, हात डोळे आणि सारे काही आहे. जीव लावणारे आईबाबा, भाऊबहीण आहेत. आपण का रडायचे? आपण का थकायचे आणि कसले दु:ख बाळगायचे. या विचारांनी तिच्या वैचारिक आणि आत्मिक विश्वाचा जणू पुनर्जन्मच झाला. ती बालिका होती चाळीसगावची मीनाक्षी निकम. ‘स्वयंदीप हो’ स्वामी विवेकानंदाचे वाक्य आयुष्याचा मंत्र म्हणून जगणार्‍या मीनाक्षी निकम. २००० साली त्यांनी ‘अपंग विकास बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली. पुढे २००८ साली या संस्थेअंतर्गत त्यांनी दिव्यांग आणि सर्वार्थाने निराधार असलेल्या महिलांसाठी ‘स्वयंदीप वसतिगृह’ सुरू केले. पदव्युत्तर कला शाखेचे शिक्षण घेतलेल्या आणि ‘फॅशन डिझायनिंग’ प्रशिक्षित असलेल्या मीनाक्षी यांचा वस्त्रोद्योग व्यवसाय आहे. त्या व्यवसायातून मिळणारा नफा त्या दिव्यांग बंधु-भगिनींच्या उत्थानासाठी उपयोगात आणतात.आजपर्यंत त्यांनी ३०० दिव्यांग महिलांना स्वयंरोजगाराचे विनामूल्य प्रशिक्षण दिले. शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्युटिशिअन आणि इतर अनेक प्रशिक्षण, ज्यामुळे या मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतील. त्यासोबतच त्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दिव्यांग वधुवर मेळावाही आयोजित करतात. या मेळाव्यात १७२  वधुवरांचे विवाह जुळले आहेत. मीनाक्षी यांच्याच संस्थेच्या कार्यालयात १२ मुलींचे विवाह सोहळाही पार पडला आहे. त्याचे सर्व आयोजन आणि इतर सर्वच जबाबदार्‍या त्यांनी हौसेने आणि पालकत्वाच्या भावनेने पार पाडल्या.




आजही ग्रामीण भागात तर सोडाच, पण शहरी भागातही ‘मुलगी झाली’ हा शब्द अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. त्यात जर तिला अपंगत्व आले तर? तर त्या मुलीच्या जगण्याची वेदना शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. आपल्या घरात दिव्यांग मुलगी आहे, हे बाहेर कळू नये याची कठोरपणे तजवीज करणारेही असंख्य पालक असतात. त्यामुळे दिव्यांग मुलींचे शिक्षण किंवा भवितव्य आजही अंधारतच असते. पण, या सगळ्या भयंकर वास्तवाला छेद दिला, तो मीनाक्षी यांनी. त्यात त्यांच्या आईबाबांचा म्हणजे राजाराम आणि इंदू यांचा मोलाचा वाटा आहे. मीनाक्षी यांच्या भाऊबहिणीचेही योगदान मोठे. मीनाक्षी काहीतरी वेगळी आहे, याची त्यांनी तिला कधीही जाणीव होऊ दिली नाही. चारचौघींसारखे सहज आयुष्य जगावे, कुणावरही न विसंबता आपले जीवन जगावे, यासाठी निकम कुटुंबीयांनी मीनाक्षी यांना नेहमीच प्रोत्साहन दिले.त्यांच्या लहाणपणीची एक आठवण. मीनाक्षी कशाबशा चारपाच पायर्‍या उतरल्या. सोबत त्यांचे बाबा होतेच. एक खेळ म्हणून मीनाक्षी पुन्हा त्या पायर्‍या चढू लागल्या. पण त्यांना ते सहजासहजी जमले नाही. त्यांनी बाबांकडे अपेक्षेने पाहिले. मात्र, बाबांनी मुळीच मीनाक्षी यांना उचलले नाही. बाबा दुर्लक्ष करत आहेत म्हणून रागाने त्या कशाबशा पायर्‍या चढल्या आणि बाबांना म्हणाल्या, “मला पायर्‍या चढायला त्रास होतो. तुम्ही मला मदत का केली नाही?” यावर राजाराम म्हणाले, “बाळा, प्रयत्न केले आणि तू पायर्‍या चढलीस. तुझ्यासाठी जगात कोणतीच अशक्य गोष्ट नाही. कुणाच्याही मदतीची, आधाराची अपेक्षा न करता तुला तुझे सर्व काही करायचे आणि तू करणार.” बाबांचे म्हणणे एकून मीनाक्षी यांना वाटले, बाबांना आपल्यावर विश्वास आहे की, आपण एकटीने आपले सर्व काही करू शकतो. यातूनच मग मीनाक्षी स्वत:ची प्रत्येक गोष्ट स्वत: करण्याचा प्रयत्न करू लागल्या. दुसरीकडे त्यांना शाळेत परदेशी नावाचे शिक्षक होते.






तेसुद्धा मीनाक्षीना नेहेमी सांगत की, ”तू शिकायला पाहिजेस. पोलिओ झालेले पाय हे तुझ्या जीवनाचे अडसर ठरू देऊ नकोस.” शाळेत नेण्यासाठी सुरुवातीला कुणी नसायचे. त्यावेळी परदेशी गुरूजी मीनाक्षीच्या घरी येऊन त्यांना शिकवायचे. एकंदर पोलिओमुळे आयुष्यात अडचण निर्माण झाली असली, तरी घरच्यांचा स्नेह, गुरूजनांचा आधार आणि संस्कार यामुळे मीनाक्षी यांचा आत्मविश्वास कधीच डळमळला नाही. आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्यास त्या कधीच कचरल्या नाहीत. असाच एक प्रसंग अपंगत्वाचा दाखला जळगावला आठवड्यातून एकदाच मिळायचा. छोट्या भावाच्या पाठीवर बसून मीनाक्षी तिथपर्यंत पोहोचल्या. मात्र, काही कारणास्तव त्यादिवशी तो दाखला दिला गेला नाही. आजूबाजूच्या गावातून घामाघूम आणि हवालदिल झालेले दिव्यांग रांगा लावून उभे. त्यांचे पालकही हतबलतेने उभे. मात्र, मीनाक्षी यांनी याविरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्या दिवशी केवळ मीनाक्षी यांना दाखला देणार, असे तेथील अधिकार्‍याने सांगितले. पण मीनाक्षी म्हणाल्या, “मला एकटीला नाही तर इथे सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येकाला दाखला द्या.” शेवटी अधिकार्‍यांना मीनाक्षी यांचे म्हणणे मान्य करावे लागले. अन्यायाविरोधात दिव्यांगाच्या समर्थनार्थ उठवणारा आवाज सक्षमपणे उठवला पाहिजे, त्यातून यश मिळतेच याची जाणीव करून देणारा हा प्रसंग. असो, दिव्यांग म्हणून वैयक्तिक आयुष्यात आलेल्या सर्वच आव्हानांचा सामना करत मीनाक्षी जगत होत्या. पण नशिबानेही परीक्षाच पाहायचे ठरवले. त्या जेव्हा १२ वर्षांच्या होत्या, तेव्हा पितृछत्र हरपले. घरचा आधारस्तंभ गेला. घर कसे चालणार? पण त्यांची आई इंदू आणि त्यांनी घरात शिवणकाम सुरू केले. त्यात इतकी सुबकता होती की, त्यांच्या कामाची ख्याती गावभर झाली. कामे येऊ लागली. आपल्याला हे जमतंय म्हटल्यावर मीनाक्षी यांनी ‘फॅशन डिझायनिंग’चा कोर्सही केला. त्यातच वस्त्रोउद्योगही उभारला. आधुनिक आणि पारंपरिक मेळ जमवत सुरेख तयार कपडे. यामुळे मीनाक्षी यांचा व्यवसाय तेजीत आला. गावातल्या महिलांना प्रशिक्षित करत त्यांना या व्यवसायात काम दिले गेले. आपण जीवनात प्रत्येक समस्येवर मात करू शकलो. तसेच इतर दिव्यांगही मात करू शकतात. केवळ त्यांना योग्य मार्गदर्शन स्नेह मिळायला हवा. या विचारांनी मीनाक्षी यांनी ‘अपंग विकास बहुउद्देशीय संस्था’ सुरू केली. पुढे ‘स्वयंदीप वसतिगृह’ सुरू झाले. येणार्‍या काळात चाळीसगाव येथे एक फॅक्टरी सुरू करण्याचे नियोजित आहे. त्यामध्ये संचालक, अधिकारी आणि सर्व कर्मचारी हे दिव्यांगच असतील. देशातला हा पहिलाच उपक्रम आहे. ‘अंतरीचा दीप उजळवूया, मोठी स्वप्ने पाहूया आणि सत्यात उतरवूया’ असे म्हणत स्वत:सोबतच समाजातील दिव्यांगांच्या आयुष्यात सक्षम स्वावलंबनाचा ‘स्वयंदीप’निर्माण करणार्‍या मीनाक्षी निकम. त्यांना ‘केशवसृष्टी’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन !













@@AUTHORINFO_V1@@