कृष्णानंद भारती स्वामी : एक कृतकृत्य जीवन

    10-Nov-2021
Total Views | 114

yogi 2.jpg_1  H



श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचा विचार हाती घेऊन ज्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या शब्दाशिवाय ज्यांची बोलण्यास सुरुवात होत नसे, तेच पूर्वाश्रमीचे डॉ. प्रा. राष्ट्रीय कीर्तनसम्राट श्रीकृष्ण वामनराव सिन्नरकर महाराज. ही सुरू झालेली जीवनयात्रा अलीकडे श्रीकृष्णानंद भारती स्वामी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘ज्ञानेश्वर माऊली’ ते ‘नमो नारायण’ हा प्रवास ३० ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री शांत झाला. महाराजांच्या जीवनविचारांचे स्मरण मांडण्याचा केलेला हा प्रयत्न ...




सिन्नर येथील नामवंत कीर्तनकार वामनराव सिन्नरकर महाराज यांचे घरी २८ फेब्रुवारी (तुकाराम बीज) या दिवशी पुत्ररत्न जन्माला आले. आपल्या घराण्याचा कीर्तनाचा प्रकाशित वारसा समाज प्रबोधनाने त्यांनी प्रज्वलित केला. बारागाव पिंप्री येथे जन्माला आलेले बारागाव पिंप्री, सिन्नर, नाशिक असा शिक्षणाचा भाग पूर्ण करत त्यांचे तरुण वयातच कीर्तन रोमरोमात जागे झाले. त्यांनी अनेक नोकर्‍यांना नकार देत कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करण्याचे ठरविले. यातच नारदीय (राष्ट्रीय) कीर्तन करत असताना खर्‍या इतिहासाची माहिती समाजाला देताना त्यांना वारंवार कारावास, बंदी अशा विषयांना सामोरे जावे लागले. २९ वेळा जिल्हाबंदी करण्यात आली. त्यावेळी आर्थिक बाजू कोलमडत असताना संघर्ष करीत खर्‍या इतिहासाची पाने समाजाच्या मनापर्यंत पोहोचवली. यानंतर उच्च न्यायालयाचा निकाल महाराजांच्या बाजूने लागला. ते सांगतात, “ते सत्य आहे त्याचे दोन अर्थ निघतात. ते चांगल्या अर्थाने खरे बोलतात आपण अयोग्य अर्थ लावतात. त्यामुळे अशा बंदी या निरर्थक आहेत. यानंतर बंदी घालणार्‍यांवर कारवाई होईल,” अशा निर्णय आला. जीवनभर संघर्ष करणार्‍या या महात्म्याचे हास्य कणभरही कमी झाले नाही.त्यांचे ब्रीदच होते, ‘जगायचे तर वाघासारखे, शेळीसारखे नाही.’ त्यांच्या ज्ञानाचा वाहता झरा त्यांना आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्राशी जोडत होता. हे कार्य करत असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू एकता आंदोलन या आणि हिंदुत्वासाठी झटणार्‍या प्रत्येक संस्थेशी जोडले गेले होते. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थाही त्यांचे विचार त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत होते. हाच ज्ञानाचा झरा नदीतून सागरात रूपांतरित होत होता. अफाट वाचन, पुस्तक संकलन ते जसेच्या तसे मेंदूपर्यंत परावर्तित होत होते. म्हणून कीर्तनात अनेक तारखा, दाखले यांचे पुराव्यासहित वर्णन ते जसेच्या तसे देत.






एकदा एका वकिलाने त्यांना विचारले, “तुम्ही एवढी माहिती ‘परफेक्ट’ कोणताही कागद हाती नसताना देत आहात, तर आम्हाला असे वाटते आपल्या फेट्यात संगणक बसलेले आहे का? आपण फेटा सोडून दाखवावे. ” वडिलांनी तत्काळ फेटा सोडला व सांगितले, “संगणक फेट्यात नाही, देवाने मेंदूत बसविले आहे.” पोलिसांचा घरावर आणि त्यांच्या भोवती गराडा असे. या सर्वांतून पुढे जात त्यांनी समाजाला घडवत कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडत आपले शिक्षणही चालू ठेवले. मराठी-संस्कृत एम. ए., संत ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांच्यावर पीएच.डी शिवाय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात डि.लिट पदवीचाही अभ्यास करत होते. यासाठी १५ पुस्तके त्यांनी लिहिली. एम. एस. गोसावी सर यांचे अतुलनीय मार्गदर्शन त्यांना लाभत होते. ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ हा श्री दत्तात्रेयांचा ओवीबद्ध केलेला सरळ सुफल ग्रंथ, ‘चांगदेवपासष्टी’, ‘उपनिषदांचे सार’, ‘पंच संतचरित्र’, वेद विवरण, ‘१९५७ ची आठवण’ (दलितमित्र सहवास) ‘नरोत्तम पार्थ’ (अर्जुनावरील नाटक ) काव्यखंड, काव्यपायरी, ‘रामायण भाग १’ व ‘भाग २’ ही आणि अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.





आपली कीर्तनाची सेवा देश-विदेशात शब्दरूपांनी समाजापुढे मांडताना ११ हजारांपेक्षा अधिक कीर्तने करून ११ महजार कीर्तनांचा रेकॉर्ड करत ‘गिनिज बुक रेकॉर्ड’ करणारे पहिले कीर्तनकार ठरले म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात त्यांचा सत्कारही करण्यात आला. ‘राष्ट्रीय कीर्तन सम्राट’, ‘कीर्तन सार्वभौम’, ‘कीर्तन साम्राज्य चक्रवर्ती’ अशा अनेक पदव्या ‘न भूतो न भविष्यति’ असे कुणालाही प्रारब्ध प्राप्त झाले नाही, ते माझ्या पिताश्रींनी प्रयत्नांनी मिळविले. राष्ट्र, धर्म, देश यांच्या कार्यासाठी त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते निर्माण झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारी विचारांचे बीज पेरताना छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाजरचनेचे रोप गावागावांत लावताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांचे सामाजिक विचार सर्वत्र पेरत इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकीय देश हिताचे विचार वार्‍यासारखे पसरविले. हे सर्व विचार पोहोचण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई यांच्या विचारातून संतांच्या मार्गाने जीवन जगण्याचा रस्ता ते समाजाला देत होते.





मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषेतून कीर्तन करताना आपला ज्ञानरुपी झरा देश-विदेशातून वाहून पुन्हा आपल्या स्थानी गोदावरीत विसर्जित झाला. अशा पद्धतीने सहजतेने कोणत्याही आशेशिवाय आपले कार्य करताना त्यांनी आम्हा मुलांवर उत्तम संस्कार केले. त्यांच्या दोन मुली, मुलगा, सून व नातू या सर्वांना आपले जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार या महात्म्याने दिला. सुनेलाही मुलीप्रमाणे वागविले, नातवालाही त्याच्या आवडत्या विषयात म्हणजे क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले. हे सर्व करत असताना जीवनाच्या अंतिम टप्प्यात त्यांनी सर्व संसार सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला. सहजरित्या वैचारिक क्षमतेवर संघर्ष करून त्यागाच्या भूमिकेतून संन्यस्त म्हणून जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत ते पोहोचले. त्यांच्या जीवनात हे सर्व त्यांच्या मनाप्रमाणे घडण्यासाठी ते जितके कणखर होते, तितकीच कणखर त्यांची पत्नी म्हणजे माझी आई वृषाली श्रीकृष्ण सिन्नरकर ही आहे. आज त्यांच्या संन्यासामुळे तिलाही दैवी रूप प्राप्त झाले आहे. कारण, तितक्याच संघर्षाला तोंड देत ती कायम त्यांच्या पाठीशी उभी होती.



वाणोत निंदोत सुनीती मंत
चळो असो वा कमला गृहात
हो मृत्यू आजची घडो युगांती
सन्मार्ग टाकूनी भले न जाती



याप्रमाणे ते कायम निंदा-स्तुतीच्या पलीकडे जाऊन संतांच्या मार्गाने चालत होते. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा संतांचा मार्ग त्यांनी अवलंबिला होता. यातूनच ते संतपदापर्यंत पोहोचले. त्यांचा अप्रतिम, अविश्वसनीय डोळे दीपवणारा समाधी सोहळा संपन्न झाला आणि खरोखर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे


अवघाची संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक


आज त्यांनी खरोखरच सुखाचा संसार करून तिन्ही लोकात आनंद भरला आहे, तरीही मी त्यांची मुलगी ते मला अजून हवे होते. मला विचारायचे त्यांनाही आणि भगवंतानाही की ते मन निष्ठुर का केले?



- वैजयंती सिन्नरकर




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121